Tuesday, October 20, 2026
Homeराजकीय"मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार...", संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

“मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार…”, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा केंद्रबिंदू असलेला गणेशोत्सव आता धार्मिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून कॉर्पोरेट वॉरचे केंद्र बनतोय का? असा संतापजनक सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या भूमिकेवर तीव्र तीव्र आक्षेप नोंदवला आहे. “आता गणपतीत फक्त गरबा खेळायचाच बाकी राहिला आहे,” अशा घणाघाती शब्दांत त्यांनी गणेशोत्सवाच्या व्यावसायिकतेवर ताशेरे ओढले.

- Advertisement -

बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी थेट ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर निशाणा साधला. गणेशोत्सवाला मिळणारे हे कॉर्पोरेट स्वरूप अत्यंत दुर्दैवी असून, यासाठी भविष्यात इतिहास लालबागच्या राजा मंडळाला कधीही माफ करणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी यावेळी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे म्हणाले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या मातीतील, मराठी माणसाचा सण आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या सणाला कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. उत्सव थाटामाटात साजरा करण्यासाठी पैसे लागतात, हे मान्य आहे; पण लालबागच्या राजाकडे दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या जमा होतात. सामान्य जनता स्वतःहून दान देते, मग अशा वेळी उद्योगपतींची गरज काय? उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील अनंत अंबानी असा काय वेगळा सल्ला देतात, जो इतकी वर्षे मंडळाला मिळाला नव्हता? गणेशोत्सव मंडळाची कंपनी बनवायची आहे का?” त्यांनी पुढे नमूद केले की, एका उद्योगपतीला सल्लागार म्हणून घेतल्यानंतर आता इतरही बडे उद्योग समूह या स्पर्धेत उतरत आहेत. उद्या जेएसडब्ल्यू, गोदरेजसारख्या कंपन्या येतील आणि ही गणेशोत्सव मंडळे केवळ कॉर्पोरेट संघर्षाचे ठिकाण बनतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण प्रकाराला लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हेच मुख्यत्वे जबाबदार असल्याचा थेट आरोप संदीप देशपांडे यांनी केला. “सुधीर साळवी माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी घेतलेली ही भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. अदानी आणि अंबानी हे व्यावसायिक आहेत; जिथे नफा दिसतो तिथेच ते गुंतवणूक करतात. तुम्ही आमच्या आराध्य दैवताचा वापर मार्केटिंगसाठी करत आहात का? मला या गोष्टीची प्रचंड संताप आणि चीड येते,” असे ते म्हणाले.

शेवटी, मुंबईतील सर्व मराठी तरुण आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या विषयावर गंभीर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले. “आपण जे करतोय ते खरोखर योग्य आहे का, याचा विचार आजच करायला हवा. नाहीतर येत्या ५० वर्षांत ‘लालबागचा राजा’ किंवा ‘चिंतामणी’ हे गणपती मराठी अस्मितेऐवजी बड्या उद्योगपतींच्या नावाने ओळखले जातील,” असा इशारा देत त्यांनी मराठी तरुणांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, “रेजिम चेंजचा एल्गार आज…”

0
मुंबई । Mumbai शिवसेनेच्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच, आज (२० ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा...