अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नोकरी देण्याच्या आमिषाने मुलींची फसवणूक करत असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्यासह सात ते आठ जणांनी एका तरुणाला मारहाण केली. योगेश लक्ष्मण थोरात (वय 28 रा. अरणगाव ता. जामखेड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (27 सप्टेंबर) दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान दिल्लीगेट येथील मनसेच्या कार्यालयात ही घटना घडली.
याप्रकरणी योगेश थोरात यांनी शनिवारी (28 सप्टेंबर) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून वर्मासह सात ते आठ जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित वर्मा (रा. माणिक मोतीनगर, सक्कर चौक, नगर), अमोल उर्फ अंबरनाथ भालसिंग (रा. हनुमाननगर, अरणगाव रस्ता, नगर), अनिकेत भाऊ सियाळ (रा. शिवाजीनगर, नगर), प्रकाश गायकवाड (रा. नगर) व इतर तीन ते चार अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगेशची एका मुलीसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्या मुलीने योगेशला तुमच्याकडे जॉब आहे का? असे विचारले होते. तेव्हा योगेशने तिला समक्ष भेटू असे सांगितले होते.
ते दोघे शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेल समोर भेटले. त्या मुलीसोबत एक मुलगा आला व तो योगेशला ‘माझ्याकडे कामासाठी अजून मुली आहे, तु आमच्यासोबत दिल्लीगेट येथे चल’ असे म्हणाला. चारचाकीत वर्मा, भालसिंग, सियाळ, गायकवाड हे सर्व जण होते. त्यांनी योगेशला चारचाकीतून दिल्लीगेट येथील मनसेच्या कार्यालयात आणले. तेथे त्यांनी योगेशला ‘तु मुलींकडून मेकअप आर्टीस्टच्या कामासाठी दोन-दोन हजार रुपये घेऊन तुम्हाला जॉब देतो, असे सांगून फसवणूक करतो’ असे म्हणून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.