धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरातील गल्ली नं. 5 मधील बेकायदेशीर वृक्ष तोडणार्या ठेकेदारावर आणि दुर्लक्ष करणार्या मनपा अधिकार्यांवर कारवाई करावी यासाठी
आज महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष हर्षल राजेश परदेशी यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना महापालिकेच्या प्रवेशव्दारावर पोलिसांनी रोखत ताब्यात घेतले.
शहरातील गल्ली नं. 5 मधील हस्ती बँकेच्या समोरील जीवंत हिरवेगार निंबाचे झाड दि. 5 डिसेंबर रोजी विना परवानगी तोडण्यात आले. तसेच जीवंत झाड तोडून दिवसा त्या झाडाच्या लाकडाची वाहतूक करण्यात आली.
मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी घेवून अनामत रक्कम भरुन आणि सबळ कारण असेल तरच वृक्ष तोडण्याची परवानगी दिली जाते.
मात्र कोणतेही कारण नसतांना गल्ली नं. 5 मधील वृक्षाची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आली. याबाबत तक्रार करुन कारवाईची मागणी हर्षल परदेशी यांनी मनपा आयुक्त अजीज शेख यांच्याकडे केली होती.
परंतू आठ दिवस पाठपुरावा करुन देखील त्याबाबत दखल घेतली नाही. वृक्ष तोडणार्या ठेकेदारावर आणि दुर्लक्ष करणार्या मनपा अधिकार्यांवर कारवाई केली नाही. त्यामुळे आत्मदहनाचा इशारा हर्षल परदेशी यांनी दिला होता.
आज सोमवारी सकाळी महापालिकेच्या प्रेवश व्दारासमोर हर्षल परदेशी यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते जमले. त्यावेळी पोलिसांनी हर्षल परदेशी यांना अडवले, त्यांच्याकडील पेट्रोलची बाटली हिसकावून घेवून त्यांना ताब्यात घेतले, यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रसाद देशमुख, गौरव गिते, यश शर्मा, शुभम माळी, सकलीन शेख, शामक दादाभाई, ओम कासार आदी उपस्थित होते.