राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षकाने मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवून छेडछाड केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात शिक्षकावर पोक्सो व अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवले. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत कोणाला काही सांगीतले तर छडीने मार देईल, अशी धमकी दिली. मात्र सदर प्रकार एका मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितला. पालकांनी ताबडतोब शाळेत जाऊन माहिती घेतली. त्यानंतर पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली.
त्यानुसार गणेश तुकाराम खांडवे, रा. राहुरी. या शिक्षकावर भारतीय न्याय संहिता कलम 75, 79 तसेच बालकांचे लैंगीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 8,10,12 तसेच अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3 (1) (डब्लू) (आय), 3 (1) (डब्लू) (2), 3 (2) (व्हीए) नुसार छेडछाड, पोक्सो व अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस पथकाने आरोपी शिक्षक गणेश खांडवे यास ताबडतोब अटक करून जेरबंद केले आहे. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे करीत आहेत.