अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बुरूडगाव रस्ता परिसरातील भाडोत्री रूममध्ये राहणार्या चौघांचे मोबाईल चोरणार्याला कोतवाली पोलिसांनी 12 तासात अटक केली. त्याच्या ताब्यातून 43 हजाराचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. परवेज मेहमुद सय्यद (वय 23 रा. भांबळगल्ली, बुरूडगाव रस्ता) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
प्रवीण रामदास खेडकर (वय 20 रा. बुरूडगाव रस्ता, नगर मुळ रा. चिंचपुर, ता. पाथर्डी) यांच्यासह त्यांच्या रूम मध्ये राहणार्या इतर तिघांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (20 सप्टेंबर) रात्री सव्वा बारा ते शनिवारी (21 सप्टेंबर) सकाळी सहाच्या दरम्यान चोरून नेले होते. या प्रकरणी खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मोबाईल चोरट्यांचा शोध कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथका कडून घेतला जात असताना भांबळगल्ली परिसरातून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव परवेज मेहमुद सय्यद असे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता बुरूडगाव रस्ता परिसरातील घरामधील मोबाईल चोरी केले असल्याची कबूली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे चारही मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक निरीक्षक विकास काळे, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार वसंत सोनवणे, योगेश भिंगारदिवे, सूर्यकांत डाके, विक्रम वाघमारे, विशाल दळवी, विजय काळे, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे, सतीष शिंदे, सोमनाथ राऊत, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे.