श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बुध्दीसह सदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे मुलांचा मानसिक व बौध्दीक विकास मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मैदानी खेळापासून आजची पिढी दूर होत चालली आहे. खेळाची जागा मोबाईलवरील गेम्सनी घेतली आहे. हे गेम्स मैदानी खेळांवर भारी पडत आहे. या परिस्थितीला पालकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, केवळ मोबाईलवरील गेम पाहिल्याने मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. तर त्यांची प्रतिकार शक्तीही कमी होत आहे.
तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत चालले आहे. फोर जी, फाईव्ह जी च्या जमान्यात या बदलाचा वेगही वाढत चालला आहे. भविष्यात काय वाढवून ठेवले आहे, याचा अंदाज न लावलेला बरा.. याचा परिणाम मुलांवर न झाला तर नवलच. त्यामुळे या बदलाच्या वार्यापासून मुलांना वाचविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, त्यावर काही उपाय करावेच लागणार आहेत. आजवर पालक व शिक्षक मुलांना मोबाईलपासून दूर राहाण्याचे आवाहन करायचे, आज तेच पालक व शिक्षक मुलांच्या हातामध्ये शिक्षणासाठी मोबाईल देत आहेत. करोनापासून ऑनलाईन शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. या संक्रमणाच्या अवस्थेत मुलांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करणे, हे पालक व शिक्षकांपुढील मोठे आव्हान ठरणार आहे. कारण मोबाईलचे मोठे दुष्परीणाम आता दिसायला लागले आहेत.
मुलांना नवीन गोष्टी शिकण्याचे, नवीन गोष्टी अवगत करण्याचे वेड जन्मजात असते. यासाठी आपल्याला विशेष काही करण्याची गरज नाही. ही भूक नैसर्गिक असते. आणि ती भागविण्याचे काम मोबाईल करत असतो. समाज माध्यमांवर प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन दिसते. लहान मुलांना हे समजले नाही तरी नवीन व्हीडीओ समोर येतात. मोबाईल एकच वस्तू जरी असली तरी त्यावर गेम, व्हिडीओ यासह जगातील अनेक नवनवीन गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. या गोष्टी सर्च करण्यासाठी सोशल मीडियावर मुलांना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे मुले दीर्घकाळ मोबाईलवर घालवितात. त्यातून बाहेर पडण्यासाठी ते तयार नसतात. या परिस्थितीकडे लक्ष दिले नाही तर कालांतराने मोबाईलचे व्यसन लागते. त्यामुळे पालकांनी व शिक्षकांनी पुढील संभाव्य धोका समजून सावधगिरीचे पाऊले उचलण्याची गरज आहे.
मुलांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देणे
मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल तर घराबरोबरच शाळेतही मुलांना मैदानी खेळांचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. मैदानी खेळांमुळे मुलांचा शारिरीक, मानसिक विकासाबरोबरच आत्मविश्वास देखील वाढतो. त्यामुळे मुलांना मैदानी खेळाचे महत्व पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.