Sunday, July 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजModi 3.0 : 'असं' आहे NDA चे मंत्रिमंडळ; पाहा पक्षनिहाय यादी

Modi 3.0 : ‘असं’ आहे NDA चे मंत्रिमंडळ; पाहा पक्षनिहाय यादी

भाजपचे ७० पैकी ६० तर नितीश कुमार, चंद्राबाबूंच्या पक्षाचे किती खासदार मंत्री?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडला असून या सोहळ्याला परदेशी पाहुणे तसेच देशभरातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. यावेळी मोदींसह एनडीएच्या एकूण ७२ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे कालपासून खऱ्या अर्थाने मोदी सरकार ३.० हे नवे पर्व सुरु झाले आहे.

मोदी सरकार ३.० मध्ये सहा माजी मुख्यमंत्र्यांना देखील संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये राजनाथ सिंह तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री बनले आहेत, तर शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल खट्टर पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. याशिवाय आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनाही मंत्री करण्यात आले आहे. यासोबतच भाजपचे सहयोगी हम पक्षाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि जेडीएस नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते. पंरतु, एनडीएला बहुमत मिळालेले होते. त्यामुळे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावरच पुढची ५ वर्षं मोदी सरकारचा कारभार चालविणार जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुठल्या पक्षाला किती महत्त्व दिलं जातं, याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. त्यानंतर आता पहिल्या शपथविधीतील मंत्र्यांची सविस्तर यादी समोर आली असून त्यातून हे चित्र स्पष्ट झाले आहे.

मोदी पंतप्रधान, तर भाजपचे इतर २५ खासदार थेट कॅबिनेट मंत्री

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर एकूण ३० खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये २५ एकट्या भाजपचे होते. याशिवाय संयुक्त जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष, लोजप, एचएएम आणि टीडीपी या पक्षांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ३६ खासदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्येही भाजपाचाच वरचष्मा राहिला असून पक्षाच्या ३२ खासदारांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. त्याशिवाय रामदास आठवलेंच्या रुपात रिपाइंला १, जदयूला २ तर टीडीपीला १ राज्यमंत्रीपद मिळाले आहे.

राज्यमंत्री स्वतंत्र पदभार, फक्त ५ खासदारांना संधी

तसेच जे पद महाराष्ट्रात अजित पवार गटाला देण्यात आले होते आणि जे त्यांनी नाकारले, त्या राज्यमंत्री पद स्वतंत्र पदभारसाठी अवघ्या पाच खासदारांनी शपथ घेतली. त्यामध्येही भाजपाचे तीन खासदार, शिंदे गटाचा एक तर रालोदच्या एका खासदाराचा समावेश आहे.

अशी आहे पक्षनिहाय मंत्रीपदांची संख्या

एकूण मंत्रीपदे -७१

पंतप्रधानपद – नरेंद्र मोदी, भाजपा
कॅबिनेट मंत्री -३० (भाजपा-२५, जदयू-१, जेडीएस-१, लोजप-१, एचएएम-१ टीडीपी )
स्वतंत्र पदभार – ५ (भाजपा-३, शिवसेना-१, रालोद-१)
राज्यमंत्री – ३६ (भाजपा-३२, रिपाइं-१, जदयू-२, टीडीपी-१)

राज्यनिहाय मिळालेली मंत्रीपदे

महाराष्ट्र – २ कॅबिनेट,१ स्वतंत्र पदभार, ३ राज्यमंत्री
गुजरात -४ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
उत्तर प्रदेश – १ कॅबिनेट, १ स्वतंत्र पदभार, ७ राज्यमंत्री
बिहार – ४ कॅबिनेट, ४ राज्यमंत्री
पश्चिम बंगाल – २ राज्यमंत्री
तमिळनाडू – २ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
हिमाचल – १ कॅबिनेट
जम्मू-काश्मीर – १ स्वतंत्र पदभार
मध्य प्रदेश – ३ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
हरियाणा – १ कॅबिनेट, १ स्वतंत्र पदभार, १ राज्यमंत्री
कर्नाटक – २ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
ओडिशा – ३ कॅबिनेट
आसाम – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
आंध्र प्रदेश – १ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
झारखंड – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
अरुणाचल प्रदेश – १ कॅबिनेट
पंजाब – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
तेलंगणा – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
राजस्थान – १ स्वतंत्र पदभार, १ राज्यमंत्री
गोवा – १ राज्यमंत्री
केरळ – २ राज्यमंत्री
उत्तराखंड – १ राज्यमंत्री
छत्तीसगड – १ राज्यमंत्री
दिल्ली – १ राज्यमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या