नवी दिल्ली वृत्तसेवा | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर निवडून आल्यानंतर त्यांनी आणीबाणीप्रकरणी संसदेत मोठा गदारोळ केला. आणीबाणीवरून काँग्रेसला घेरले. आणीबाणी म्हणजे संविधानाची हत्या असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आता त्याही पुढे जाऊन केंद्र सरकारने दरवर्षी २५ जूनला संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे. अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय ‘२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून, हुकूमशाही मानसिकता दाखवत लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकले गेले, आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला. त्यामुळे २५ जून हा दिवस केंद्र सरकारने दरवर्षी ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या महान योगदानाची आठवण ठेवेल’.
काँग्रेस पक्षाने मूलभूत स्वातंत्र्य आणि भारताचे संविधान पायदळी तुडवले होते. केवळ सत्तेला चिकटून राहण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रत्येक लोकशाही तत्त्वाचा अवमान करून देशाला तुरुंगात टाकले होते”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीच्या ४९ व्या स्मृतीदिनी म्हटले होते. तसंच, भाजपाने सातत्याने आणीबाणीप्रकरणावरून काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश हुकूमशाही सरकारच्या अत्याचारांना तोंड देऊन लोकशाहीच्या हितासाठी लढलेल्या लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणं आहे. ‘संविधान हत्या दिन’ प्रत्येक भारतीयात लोकशाहीचं रक्षण आणि व्यक्ति स्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवेल. यामुळे भविष्यात देशात पुन्हा काँग्रेस सारख्या हुकूनशाही मानसिकतेची पुनरावृत्ती होणार नाही, असं शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. #SamvidhaanHatyaDiwas”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा