Monday, October 12, 2026
HomeनगरPathardi : मोहटादेवी गडावर जल्लोषात घटस्थापना

Pathardi : मोहटादेवी गडावर जल्लोषात घटस्थापना

सुवर्ण मुखवट्याची वाजत-गाजत मिरवणूक || हजारो भाविकांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सवास प्रारंभ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मोहटादेवी माता की जय, जगदंबा देवी माता की जयच्या जयघोषात, बँड पथकाच्या आणि ढोल-ताशांच्या गजरात पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर रविवारी शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पडला. देवीच्या सुवर्ण मुखवट्याची मोहटेगाव ते मोहटादेवी गड अशी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देवीच्या नवरात्रोत्सवातील पहिल्या रूपाचे भाविकांना दर्शन खुले झाले.

- Advertisement -

परंपरेनुसार रविवारी सकाळी दहा वाजता मोहटेगावातून देवीच्या सुवर्ण मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे आणि बँड पथकाच्या गजरात ही मिरवणूक मोहटादेवी गडावर दाखल झाली. मानकरी देविदास ताक यांच्या डोक्यावर देवीचा सुवर्ण मुखवटा ठेवण्यात आला होता. गडावर मुखवटा आणल्यानंतर देवीच्या मुख्य स्वयंभू तांदळावर सुवर्ण मुखवटा चढविण्यात आला. देवीला सोन्याची नथ आणि विविध सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. फुलांच्या आकर्षक सजावटीने देवीचा गाभाराही सुशोभित करण्यात आला होता. देवीचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मोहटा देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप आणि त्यांच्या पत्नी सुजाता जगताप यांच्या हस्ते सपत्नीक देवीचा महाभिषेक व घटस्थापना करण्यात आली.

यावेळी देवस्थानचे विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, अ‍ॅड. कल्याण बडे, अ‍ॅड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, लेखापाल संदीप घुले आदी उपस्थित होते. पौरोहित्य भूषणदेव साकरे, भास्कर देशपांडे आणि बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही घटस्थापनेच्या दिवशी देवीचे दर्शन घेतले. दुपारी बारा वाजता महाआरती झाल्यानंतर देवीचे नवरात्रोत्सवातील पहिले रूप भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

मोहटा देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ जगताप म्हणाले, मोहटादेवी गड हे पवित्र तीर्थक्षेत्र असून, येथे शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यंदा राज्यात भरपूर पाऊस पडावा, पर्जन्यमान चांगले व्हावे आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या सुखसमृद्धीत वाढ व्हावी, यासाठी जगदंबा मातेला साकडे घातले आहे. नवरात्रोत्सवासाठी महसूल, पोलीस आणि धर्मादाय विभागासह संबंधित यंत्रणा भाविकांच्या सोयीसुविधांसाठी अहोरात्र सज्ज आहेत. मोहटादेवी गडासह तालुक्यातील धामणगाव देवी, तिसगाव, येळी, निवडुंगे आणि करंजी येथेही घटस्थापना करण्यात आली. पाथर्डी शहरातील गाडगे आमराई, आराध्याची देवी, चिंचपूर रस्त्यावरील माहूरची देवी, कालिका देवी, चौंडेश्वरी गल्लीतील चौंडेश्वरी माता, तिळवण तेली समाज मंदिरातील तुळजाभवानी देवी, नवी पेठेतील चौंडेश्वरी देवी आणि चौडाळेश्वरी देवी मंदिरांत नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सर्वत्र देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली असून, नवरात्रोत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

मशालींचा लखलखाट; तरुणाईचा जल्लोष!
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर भाविकांचा जनसागर उसळला. शनिवारी सकाळपासून रविवारी पहाटेपर्यंत लाखो भाविकांनी आईसाहेबांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर हजारो भाविकांनी मशाली (ज्योती) पेटवून मूळ गावाकडे प्रस्थान केले. डीजे, ढोल-ताशे आणि डफाच्या गजरात तरुणाईने जल्लोष केला. देवीच्या जयघोषाने गड परिसर दुमदुमला, तर मशालींच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. भाविकांच्या गर्दीमुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला. गडावरील रुंद रस्ते व पार्किंग व्यवस्थेमुळे परिसरात कोंडी झाली नाही; मात्र भक्तनिवासापासून बीड रस्त्यावरील कमानीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या. काही काळ वाहतूक ठप्प झाली. गर्दीच्या काळात रस्त्यावर छोटे-मोठे अपघातही घडले. त्यामुळे गडावर भक्तीचा उत्साह आणि परिसरात वाहतुकीचा प्रश्न असे चित्र दिसून आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : उमेदवारीसाठी एकमेकांना वाकुल्या; माघारीच्या डेडलाईनकडे लक्ष

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीसाठी अवघे दहा दिवस उरले असताना राजकीय गणितांना वेग आला आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असतानाच...