पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
श्री मोहटादेवी विश्वस्त पदासाठी दाखल केलेले अर्ज नामंजूर करण्याच्या मुद्द्यावरून मोहटे ग्रामस्थ व मोहटादेवी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात वाद रंगला आहे. विश्वस्तपदाची निवड प्रक्रिया देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी चुकीच्या पद्धतीने राबवली असल्याचा आरोप करत त्यांना या पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी शनिवारी (दि.15) पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पत्रकार परिषदेत मोहटेच्या सरपंच मनीषा पालवे, उपसरपंच अविनाश फुंदे, सेवा संस्थेचे अध्यक्ष सुलोचना दहिफळे, माजी विश्वस्त भीमराव पालवे, चंद्रकांत दहिफळे, अॅड. बाबासाहेब फुंदे यांनी विविध मुद्द्यांवर बोट ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्यावर आरोप केले. सरपंच पालवे म्हणाल्या की, मी गावची सरपंच असतानाही माझा अर्ज बाद करण्यात आला. अविनाश फुंदे म्हणाले की, मोहटे गावातून 5 विश्वस्त निवडायचे असून त्यासाठी 89 ग्रामस्थांनी अर्ज केले, मात्र आपल्या सोयीसाठी भणगे यांनी केवळ 18 अर्ज मंजूर केले. एका महिलेने आपल्या पतीचा उत्पन्नाचा दाखला सादर केला, तो चुकीचा ठरवून त्या महिलेचा अर्ज बाद करण्यात आला.
भीमराव पालवे म्हणाले की, देवस्थानच्या घटनेत विश्वस्त निवडी संदर्भात केवळ सहा मुद्दे असताना भणगे यांनी चुकीच्या पद्धतीने विश्वस्त नेमणुकीची जाहिरात दिली. त्यांच्या कामकाजावर त्रिसदस्यीय समितीने ठपका ठेवला होता, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मर्जीतील विश्वस्तांनी कारभार करावा अशी त्यांची धारणा असल्याने अनेकांचे अर्ज त्यांनी नामंजूर केले. मर्जीतील कर्मचार्यांच्या नियुक्त्या करणे, इतर कर्मचार्यांवर अन्याय करून केवळ स्वतःचे वेतन वाढवणे, दानपेटीतील पैशांची योग्य विल्हेवाट न लावणे, विश्वस्तांमध्ये दुभंग निर्माण करणे अशी कामे भणगे करत आहेत.
देवस्थानची जी कामे आहेत, ती मर्जीतील ठेकेदारालाच भणगे देतात. त्यांनी देवीगडावर पूर्वी ज्या पायर्या बसवल्या, त्यासाठी लाखो रुपये देवस्थानने खर्च केले असून हा सर्व खर्च वाया गेला आहे. शशिकांत दहिफळे यांचा मोहटे गावाशी कोणताही संबंध नसताना त्यांची विश्वस्तपदासाठी निवड करणे चुकीचे होते. भणगे यांना पदावरून हटवले पाहिजे असेही ते म्हणाले. बाबासाहेब फुंदे म्हणाले की, या संदर्भात आम्ही देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे दाद मागितली असून भणगे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करून पुन्हा नव्याने विश्वस्त निवड प्रक्रिया करावी अशी मागणी केली आहे.
आरोप निराधार : सुरेश भणगे
माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत आणि विश्वस्त निवडीची प्रक्रिया प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या मार्फत चालू असते, व या प्रक्रियेचा माझा कोणताही संबंध नाही, असे मोहटे देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, विश्वस्त पदासाठी ज्यांनी अर्ज केले होते, त्यांचे अर्ज का बाद केले गेले याची माहिती वेबसाईटवर दिली आहे. ज्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत, त्यातील कोणीही माझ्या जवळचे नाहीत. विश्वस्त निवड प्रक्रियेच्या संदर्भात काहींनी जिल्हा प्रधान न्यायाधीशांची भेटही घेतली होती. देवस्थानात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांना शासकीय नियमांनुसार वेतनवाढ दिली जाते, त्यामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्वांना त्यांच्या नियमांनुसारच वेतनवाढ दिली जाते. तसेच मोहटा देवीगडावर जाण्यासाठी पूर्वी बसवलेल्या पायर्या नवरात्र उत्सव काळात भाविकांना अडचण होऊ नये म्हणून ठराव करून बसवण्यात आल्या होत्या, ज्यासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च आला होता. सध्या या ठिकाणी रस्ता बनवण्याचे काम चालू असल्याने त्या पायर्या काढण्यात आल्या आहेत.




