पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबाबत अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, आंदोलकांवर ठिकठिकाणी दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात यावेत, मनोज जरांगे यांच्या जीवितास अपाय होण्यापूर्वी त्यांनी केलेल्या मागण्या मान्य कराव्यात या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील मोहोज देवढे येथील दहा तरुणांनी झाडावर चढून गळफास गळ्यात गुंतवून घेत आत्महत्या आंदोलन सुरू केले.
यावेळी सर्वपक्षीय पुढार्यांना गाव बंदी करून सामूहिक साखळी उपोषण मराठा आरक्षणासाठी सुरू केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात संपूर्ण गाव सक्रिय सहभागी आहे. आज आंदोलनाच्या दुसर्या टप्प्यात आत्महत्या आंदोलन हाती घेत तरुणांच्या दोन तुकड्यांमधील पहिल्या दहा जणांच्या तुकडीने हातात व गळ्यात गळफास घेत मारुती मंदिरा शेजारील पिंपळाच्या विशाल वृक्षावर विविध फांद्यांवर बसून घोषणाबाजी सुरू केली. प्रकरणाचे गांभीर्य पहात पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. नारायण राणे, रामदास कदम, गुणवंत सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आरक्षणाचा विषय शासनाच्या अखत्यारीत आहे. असे पोलीस उपनिरीक्षक योगेश राजगुरू यांनी सांगूनही आंदोलन ठाम राहिले. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर यांच्याशी पोलिसांनी आंदोलकांचे बोलणे फोनवरून करून दिले. यानंतर बारा तासांची मुदत देऊन आंदोलक गळफास हातात घेऊन झाडावरून खाली उतरले. गळफास आंदोलनात आदिनाथ देवढे, संजय देवढे, प्रकाश काटे, सचिन काटे, गणेश देवढे, नामदेव देवढे, युवराज यादव, योगेश देवढे, सचिन देवढे, अनंता देवढे आदींनी सहभाग घेतला.
यावेळी आदिनाथ देवढे म्हणाले, मनोज जरांगे समाजासाठी आंदोलन करीत असून प्रशासनाचे याकडे गांभीर्याने लक्ष नाही. सत्ताधारी पक्षांमधील काही नेते आमच्यावर तुटून पडले आहेत. आमचेच लोकप्रतिनिधी व नेते समाजाबद्दल द्वेष पसरवत आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत. पोलिसांनी निवेदन स्वीकारत वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.