कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon
कोपरगावात पैशाच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून गौतम जयसिंग बनसोडे (वय 40) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी तनुजा गौतम बनसोडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार 18 मार्च रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पुणतांबा फाटा येथील हॉटेल आनंदसमोर आरोपी रचना शिवाजी महाले (रा. मुंबई) हिच्या सांगण्यावरून संकेत मगर व इतर दोन अज्ञात इसम मोटरसायकलवर येऊन हॉकी स्टिकच्या साहाय्याने बनसोडे यांच्या डोक्यावर व पायांवर जबर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमागे जखमी व आरोपी यांच्यातील पैशाच्या व्यवहाराचा वाद कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान सदर हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे करत आहेत.




