पुणे | प्रतिनिधी Pune
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग तसेच दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून, येत्या तीन दिवसात तो केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात गोवा कर्नाटक किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे.तसेच बंगालच्या उपसागरात हवेची द्रोणीय स्थिती आहे.यामुळे मोसमी वारे वेगात भारतीय भूमिकडे वाटचाल करीत आहेत. बुधवारी बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग, दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग मोसमी वाऱ्यांनी व्यापला.श्रीलंकेचा ९५ टक्के भाग काबीज केला आहे. येत्या ३ दिवसात पूर्वोत्तर भारतासह मान्सून देवभूमी केरळात आगमन करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पश्चिम किनारपट्टीवर आठवडाभर पाऊस
दरम्यान, केरळ मध्ये जोरदार पाऊस होत असून, अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. गोवा तसेच लगतच्या कर्नाटक किनारपट्टीला समांतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे.या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून, ते पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रापासून केरळपर्यंत पुढील आठवडाभर पावसाचा कमी अधिक प्रमाणात मारा होणार आहे. यात कोकण,गोवा,कर्नाटक, केरळ मध्ये २६ मे पर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. या शिवाय या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.