अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी आणि रात्री अवकाळी पावसाने वादळी वार्यांसह जोरदार हजेरी लावली. या पावसाने कर्जत, श्रीगोंदा, अहिल्यानगर, नेवासा, राहाता, पारनेर आणि संगमनेर तालुक्यांतील अनेक गावांना तडाखा दिला. यामध्ये 25 घरांची पडझड झाली असून, एक जण जखमी झाला आहे. तसेच चार जनावरांचा मृत्यू झाला असून, सहा गोठे जमीनदोस्त झाले आहेत. फळबागा, भाजीपाला, चारा आणि अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
नेवासा तालुक्यात सर्वाधिक 16 घरांची पडझड झाली असून, संगमनेरमध्ये 7 घरे पडली. नगर आणि कर्जत तालुक्यात प्रत्येकी एका घराची पडझड झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यात 3 जनावरे, तर राहाता तालुक्यातील एक जनावर मृत्यूमुखी पडले. नेवासा, पारनेर आणि संगमनेर तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन गोठ्यांचे नुकसान झाले आहे. मे महिन्यात होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसांतील वादळ व अवकाळी पावसामुळे आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्रा, चिकू, लिंबू व केळी या फळबागांना मोठा फटका बसला आहे. मका, टोमॅटो, कांदा, मिरची व उन्हाळी बाजरीच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाऊस (मिमी मध्ये)
श्रीगोंदा 49, कर्जत 35.9, जामखेड 28.3, पारनेर 21.7, नगर 20.5, कोपरगाव 5.8, श्रीरामपूर 6.7, राहाता 6.4, नेवासा 3.9, अकोले 3.1, शेवगाव 2.4, पाथर्डी 1.9, राहुरी 1.5, संगमनेर 1.7. जिल्ह्याचा एकूण सरासरी पाऊस 14.6 मिमी इतका नोंदवण्यात आला.