अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रशांत महासागरातील समुद्री पाण्याचे तापमान व तेथील हवेचे दाब व मान्सून आगमना संबंधीच्या इतर पाच वातावरणीय घडामोडी पाहता, यंदा मान्सून देशाच्या दक्षिण टोकावर म्हणजे केरळात त्याच्या सरासरी तारखेच्या चार दिवस अगोदर म्हणजे 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी 30 मे रोजी मान्सूनचे आगमन अपेक्षित असतांना तो 31 मे रोजी केरळात दाखल झाला व प्रत्यक्षात महाराष्ट्रात मान्सूनची अरबी समुद्रीय शाखाच 10 ते 11 जूनला महाराष्ट्रात पोहोचली होती. मात्र, यंदा मान्सून केरळात 23 ते 31 मे दरम्यान कधीही दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी ‘सार्वमत’ला दिली.
दरम्यान, मुंबईत 10 जूनला व सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात 15 जुनला मान्सून अपेक्षित असला तरी अरबी समुद्रात पश्चिम किनार पट्टी समांतर मुंबईकडे येणार्या मान्सूनच्या प्रवाहात बळकपणा किती आहे, हे पाहूनच महाराष्ट्रात मान्सून जुनच्या कोणत्या तारखेला प्रवेश करील, हे सांगता येईल. त्या आधी राज्यात पूर्वमोसमी (अवकाळी) पावसाच्या सरीची अपेक्षित असल्याचे खुळे यांनी सांगितले.
यंदा वर्षी पुढील 15 दिवस म्हणजे 25 मे पर्यंत पूर्वमोसमी गडगडाटी अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे, दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा विशेष जाणवणार नाही. त्यामुळे या वर्षीचा मे महिना आल्हाददायक जाणार आहे. साधारणपणे, नैऋत्य मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात दाखल होतो. 17 सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत परतून जातो.
भारतीय हवामान विभागाने एप्रिलमध्ये 2025 च्या मान्सूनसाठी सामान्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि भारतीय उपखंडात सामान्यपेक्षा कमी पावसाच्या परिस्थितीची शक्यता नाकारली होती. दरम्यान 2009 नंतर भारतीय भूमीवर मान्सूनचे हे सर्वात लवकर झालेले आगमन असणार आहे. या आधी 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.