मुंबई | Mumbai
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पावसाने हजेरी लावली असल्याची माहिती जाहीर केली आहे. हवामान विभागाने सांगितले की, तळ कोकणात आलेल्या मान्सूनने अगदी २४ तासांहून कमी वेळात अत्यंत वायुवेगने मुंबईत धडकला असल्याचे जाहीर केले. त्यामळे १६ दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याने एक विक्रम केला आहे.
२६ मे रोजी हवामान विभागाने मुंबईमध्ये येलो अलर्ट असतानच ऑरेंज अलर्टही जाहीर केला असतानाच नव्याने पुन्हा अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, मुंबईत याआधी मान्सून लवकर येण्याचा मागील विक्रम हा २९ मे होता. १९५६, १९६२ आणि १९७१ या वर्षात नोंदवला गेला होता.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या नैऋत्य मान्सूननं मुंबई, कर्नाटक, बंगळुरू, तामिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयचा काही भाग व्यापला आहे.
मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात रविवारी (25 मे) ते सोमवारी (26 मे) रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत नरिमन पॉइंट परिसरात तब्बल २५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात एकूण २९४ मिमी पाऊस पडला आहे. तेच १०७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९१८ साली मे महिन्यात २७९ मिमी पावसाची नोंद झाली होती.
दरम्यान, मुंबई मुख्य शहर आणि उपनगरांमध्ये हवामान आणखी खराब होण्याची शक्यत असून पुढील ४८ तासांसाठी अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. यादरम्यान समुद्र खवळणार असून उंचच उंच लाटा उसळतील असाही इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबई शहरातील समुद्रात ४.७७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने मासेमार आणि नागरिकांना समुद्रानजीक न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील जनजीवन विस्कळीत
हवामान विभागाने आधी जाहीर केल्यानुसार मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख ११ जून होती. पण त्या आधीच १६ दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झाला. पण यामुळे नागरिकांची मोठी पंचाईत झाली. मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे मार्गांवर सकाळपासून पाणी भरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. गांधी मार्केट येथे पाणी भरल्यामुळे दोन्ही दिशेतील बसगाड्या भाऊ दाजी मार्गाने परावर्तित करण्यात आलेल्या आहेत. मुंबई उपनगरात सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी भरल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा