Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई । प्रतिनिधी/वृत्तसंस्था

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर आजपासून (दि.17) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडत इशारा दिला. विरोधी पक्ष सध्या गोंधळलेल्या आणि आत्मविश्वास गमावलेल्या परिस्थितीत दिसत आहे. अजित पवार सरकारमध्ये आल्याने विरोधी पक्षांचे धाबे दणाणले आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. त्याचवेळी आमची संख्या कमी असली तरी सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना दिला.

सरकारला पाणी पाजू

राज्यातील शिंदे सरकार मंत्र्यांचे खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार आणि आमदारांना सांभाळण्यात मश्गुल आहे. या सरकारकडे विकासकामांसाठी वेळ नाही. राजकीय पक्षात फूट पाडून हे सरकार उभे आहे. त्यामुळे आमच्या संख्येवर जाऊ नका. राज्यातील विरोधक एकसंघ आहेत. पावसाळी अधिवेशनात या सरकारला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत विरोधी पक्षाने आज अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर आक्रमक राहण्याचे संकेत दिले. तसेच, कलंकीत सरकारच्या चहापानात स्वारस्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणाही विरोधकांनी केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक विधान भवनात पार पडली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारच्या कारभारावर हल्ला चढवला.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधकांची संख्या कमी झाली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाबाबतही अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांची कामगिरी कशी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर आमच्या संख्याबळावर जाऊ नका, आमची संख्या कमी असली तरी सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा विरोधकांनी दिला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने ज्यांना गटनेता म्हणूनही नाकारले तेच आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. हे सरकार घटनाबाह्य आणि कलंकित आहे. विकासासाठी या सरकारकडे वेळच नाही. शेतकरी, महिला, युवाविरोधी सरकारने शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र कलंकित करण्याचे काम सरकारने केले आहे. राजकीय पक्ष फोडून पक्षच पळवून नेण्याचे सुरु असलले राजकारण पाहात राज्यात लोकशाहीचीच हत्या झालेली आहे, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी दानवे यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला. घेतला. ते म्हणाले की, कांदा उत्पादकांना 350 रुपये क्विंटल अनुदान जाहीर केले होते, पण ते मिळालेले नाहीत. नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना जाहीर केले 50 हजार प्रोत्साहन अनुदान अनुदान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेले नाही. राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विक्रम झालेला आहे. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत वसतिगृहात विद्यार्थीनीची हत्या झाली, एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या मुलीचा राजगडावर हत्या झाली. पुण्यात कोयता गँगची दहशत आहे. नागपूरात गावठी कट्टे विकले जात आहेत. त्यामुळे सरकारच जातीय दंगली घडवत आहेत, असा आरोप दानवे यांनी केला

मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मंत्रालय समोरील मित्तल टॉवरमध्ये बसून महसूल विभागाच्या बदल्यांचे आदेश जारी होतात. बदल्या आणि बढत्यांमध्ये भ्रष्टाचार आहे. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच कबूल केले आहे, याकडे दानवे यांनी लक्ष वेधले.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मागील दहा वर्षांच्या तुलनेत वर्षभरात शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या. कुपोषणाचे बळी वाढले. बालमृत्यू आणि गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. विकासकामांच्या घोषणा होतात प्रत्यक्षात काही घडत नाही. सरकार राजकारणात तल्लीन असल्यामुळे विकासकामेच होत नाहीत. फोडाफोडीच्या राजकारणात विकास मागे पडतो आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी केली.

दरम्यान, राजकीय पक्षात फूट पाडून सरकार उभे असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीही होऊ शकत नाही. धरणांमधील पाणीसाठा 27 टक्क्यांवर आला आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतकर्‍यांना जाहीर झालेली मदत मिळालेली नाही. कर्जमाफीच्या केवळ घोषणा झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. राजकारणासाठी जातीय दंगली घडवल्या जात आहेत. सहा महिन्यात पाच हजारांंहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. दुसरीकडे सरकार मात्र खातेवाटप, विस्तार आणि आमदारांना सांभाळण्यात मश्गुल असल्याचा टोला थोरातांनी लगावला. यावेळी काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाई जगताप, अभिजित वंजारी, शिवसेनेचे सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीची बैठक व्यवस्था जैसे थे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरदेखील विधानसभेतील बैठक व्यवस्था पूर्वीप्रमाणेच असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचा विधीमंडळात अद्याप अधिकृत निर्णय नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पूर्वीप्रमाणेच आसन व्यवस्था ठेवणार आहेत. मात्र काही आमदार सत्ताधारी आमदारांच्या शेजारी तर काही आमदार विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत बसण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे किती आमदार अजित पवार आणि किती आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत ते चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्र विधानसभा सभागृहात 304 आमदार बसण्याची आसन व्यवस्था आहे. सध्या विधानसभेचे 288 सदस्य आहेत.

शेतकर्‍यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

आम्ही फक्त आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली नाही तर संपूर्ण राज्याची जबाबदारी घेतली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नामोल्लेख टाळून लगावला. आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी 4,365 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यात शेतकर्‍यांवर आलेल्या संकटामुळे आम्ही शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे आहोत, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला. लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही अधिवेशनात करु, असे ते म्हणाले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला. विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. आम्ही विरोधकांना निमंत्रण दिले होते, पण ते आले नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. विरोधी पक्ष सध्या गोंधळलेल्या आणि आत्मविश्वास गमावलेल्या परिस्थितीत आहे. अजित पवार सरकारामध्ये आल्याने विरोधी पक्षाचे धाबे दणाणले आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. आता विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावे लागेल, असा चिमटाही त्यांनी विरोधी पक्षांना काढला. अजितदादा पहाटे काम सुरू करतात. मी उशिरापर्यंत काम करतो. फडणवीस ऑलराऊंडर आहेत. ते बॉलिग-बॅटीग फिल्डंग चांगली करतात. आम्ही चांगले काम करू. कोणालाही तक्रार करायला जागा ठेवणार नाही, असे शिंदे म्हणाले.

लोकहिताचे निर्णय घेऊ : फडणवीस

अधिवेशनात जे विषय अथवा प्रश्न मांडले जातील त्या विषयांवर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आमची ताकद वाढली असून याचा आम्ही कोणताही दुरुपयोग करणार नाही. आम्ही लोकहिताचे निर्णय घेऊ, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीत राज्य एफडीआयमध्ये अव्वलस्थानी पोहोचल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. सरकारवर उद्योग पळवण्याचा जो आरोप करण्यात येतो तोदेखील फडणवीस यांनी फेटाळून लावला. शरद पवारांनी राज्याचा शिक्षण दर्जा घसरला असल्याचे पत्र लिहिले, पण राज्याचा शिक्षण दर्जा घसरलेला नाही. मूल्यांकनात पहिल्या पाच श्रेणीत कोणतीच राज्ये नाहीत. त्यातही महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांना चोख उत्तर : पवार

चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे पत्र दिले होते. त्या पत्रात काही ठोस कारणे दिसली नाहीत. त्यावर कोणाकोणाच्या सह्या होत्या हेही आम्ही पाहिले आहे. आम्ही बहुमताच्या जीवावर कामकाज रेटून नेणार नाही. विरोधकांना चोख आणि मान राखून उत्तर देऊ, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या