जळगाव jalgaon। हेमंत अलोने ।
विधिमंडळ पक्षातील (legislature party) फूट आणि पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींचा (provisions of the Prohibition of Transfer Act) अभ्यास केला असता शिवसेनेतून फुटून गेलेल्या (Split from Shiv Sena) गटाचे भवितव्य अधांतरी असून फुटलेल्यांची आमदारकी रद्द (MLA canceled) होण्याचीच शक्यता अधिक दिसते आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील सुमारे 40 आणि अपक्ष बारा असे सुमारे 52 आमदार सध्या महाविकास आघाडीपासून दूर झाले असून त्यांनी सरकारलाच आव्हान दिले आहे. शिवसेनेने गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटविले असून आपल्या गटातील आमदाराची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. शिवसेनेने नव्या प्रतोदाचीही नियुक्ती केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेनेने नियुक्त केलेले गटनेते आणि प्रतोद यांना आक्षेप घेऊन नव्या गटनेते आणि प्रतोदांची नियुक्ती केली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणार्या बारा आणि चार अशा 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेने अध्यक्षांकडे केली आहे.
एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे सुमारे 40 आमदार असल्याचे बोलले जात आहे. दोन तृतीयांश आमदारांच्या गटाला वेगळे होता येते असेही सांगितले जात आहे. दोन तृतीयांश म्हणजे 37 आमदार होतात. शिंदे गटाकडे 40 आमदार असल्याचा दावा खुद्द एकनाथ शिंदे यांनी केला आहे, मात्र असे असूनही शिंदे गट गुवाहाटीमध्ये लपून का बसला आहे? मुंबईत येऊन विधानसभा अध्यक्षांकडे अथवा राज्यपालांकडे ते शक्तिप्रदर्शन का करत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे.
पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या आहेत. दोन तृतीयांश आमदार फुटले तरी नव्या गटाला दुसर्या कोणत्यातरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही पक्षात विलिनीकरण न झाल्यास या फुटीरआमदारांचे पद संपुष्टात येऊ शकते असे सांगितले जाते. मात्र काही तज्ञांच्या मते फुटलेल्या स्वतंत्र गटाला वेगळा गट म्हणून मान्यता देण्याचे अधिकार अध्यक्षांना असतात. सध्या विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ प्रभारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.श्री झिरवाळ हे कोणताही निर्णय घेताना शरद पवारांच्या मर्जीशिवाय घेतील अशी तूर्त तरी शक्यता नाही.
त्यामुळे फुटलेल्या गटाला अध्यक्षांची मान्यता मिळणे दिसते तेवढे सोपे नाही. फुटलेला गट दुसर्या पक्षात अर्थात भाजपामध्ये विलीन होईल यास फुटलेल्या गटातील सर्वच आमदार सहमत होतील याची शक्यता देखील कमी आहे. त्यामुळे विलीनीकरण करून या फुटीर आमदारांचे पद वाचवण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे करू शकणार नाहीत.
शिवसेनेने गुरुवारी 12 आणि शुक्रवारी 4 अशा 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आहे. सद्यस्थितीत या 16 आमदारांचे अपात्र होणे अशक्य नाही. हे 16 आमदार अपात्र ठरल्यास फुटीर शिंदे गटाकडे स्वतंत्र गटासाठी आवश्यक असणारे संख्याबळ उरत नाही यामुळे या बंडाला मूर्तरूप येण्याची शक्यता कमी आहे.
उलट एकनाथ शिंदे यांच्या नादी लागलेल्या आमदारांचे पद धोक्यात येण्याची शक्यता अधिक दिसते आहे. शिंदे गट शिवसेनेतून फुटून 100 पेक्षा अधिक तास उलटले असूनही एव्हाना सत्तेसाठी उताविळ असलेली भाजपा अद्याप वेट अँड वॉच मोडमध्ये दिसत आहे. त्याचे कारणच वरील बाबीत दडलेले आहे असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
सुरवातीचे दोन-तीन दिवस बॅकफूटवर दिसत असलेले मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारपासून आक्रमक भूमिकेत आलेले दिसत आहेत. काल शुक्रवारी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व प्रमुख पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांची आक्रमकता दिसून आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.