शिर्डी । प्रतिनिधी
पोटच्या लेकरांना साखळीने बांधून ठेवत आई भंगार वेचत असल्याचा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार शिर्डीतून समोर आला आहे. सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे या निर्दयी प्रकाराचा पर्दाफाश करण्यात आला असून हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
शिर्डी बस स्थानकाजवळील कंपाऊंडजवळ ही महिला गेल्या चार ते पाच महिन्यांपासून भंगार गोळा करण्यासाठी दररोज येत होती. मात्र, तिचे दोन वर्षांचे व आठ महिन्यांचे चिमुकले तिला त्रासदायक ठरू नयेत म्हणून त्यांना साखळीने गळ्यात बांधून कुलूप लावले जात होते. महिला भंगार गोळा करण्यासाठी निघून गेल्यावर हे मुलं तासंतास तिथेच एकटे राहत असत.
हा प्रकार दिवसेंदिवस सुरू असल्याने रहिवासी बाळासाहेब गायकवाड व अन्य नागरिकांनी संबंधित महिलेला समज दिली. मुलांना या प्रकारामुळे मोठा त्रास होत असल्याचे सांगत त्यांना अनाथाश्रमात ठेवण्याचा सल्लाही दिला. मात्र, महिलेने नागरिकांचे म्हणणे धुडकावून लावत हा प्रकार सुरूच ठेवला.
ज्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांना उलट पोलिसात तक्रार करण्याची धमकी ती देत होती. त्यामुळे नागरिक दुर्लक्ष करत होते. अखेर, शुक्रवारी गायकवाड व इतर रहिवाशांनी एकत्र येऊन महिलेला इशारा दिला. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होताच महिलेला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने चिमुकल्यांच्या गळ्यातील साखळी काढून तिथून पळ काढला.
महिला स्वतःचे व मुलांचे उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करत होती, मात्र पोटच्या मुलांना साखळीने बांधण्याचा अमानुष प्रकार सर्वांनाच असह्य वाटला. या घटनेमुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित महिलेविरोधात योग्य कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.