संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
शहराजवळील संगमनेर खुर्द (Sangamner Khurd) येथील मोटार पंप दुरुस्तीचे दुकान (Motor Pump Repair Shop) शुक्रवारी (दि. 15) रात्री फोडून अंदाजे 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन (Theft) नेला आहे. सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन (Theft) नेल्याचा दावा मालकाने केला आहे. या घटनेने शेतकर्यांसह परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की दिलीप रावसाहेब गुंजाळ (रा. खांडगाव) यांचे संगमनेर खुर्द येथे शिवशंकर इंजिनिअरिंग वर्क्स नावाचे दुकान असून ते मोटार पंप दुरुस्तीचे काम करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आठ वाजता ते दुकानाला कुलूप लावून घरी गेले होते.
दुसर्या दिवशी सकाळी सात वाजता गावातील विजय चांगदेव गुंजाळ यांनी सांगितले की तुमच्या दुकानाचे शटर आहे. त्यानंतर भाऊ दत्तात्रय याच्यासोबत दुकानात धाव घेतली असता मुख्य गेटला लावलेली साखळी तोडल्याचे दिसले. तसेच मुख्य दुकानाचे शटर ओढलेले होते आणि दोन्ही बाजूची कुलूपे तोडलेली होती. त्यानंतर दुकानात प्रवेश केला असता दुकानातील शेतकर्यांनी दुरुस्तीसाठी दिलेल्या मोटारींची पाहणी केली असता मोटारी आणि काही किरकोळ सामान दिसून आले नाही.
याप्रकरणी दिलीप गुंजाळ यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन 40 हजार रुपये किमतीच्या 15 मोटारी व 15 हजार रुपये किमतीचे पितळी बुश स्क्रॅप असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याची पोलिसांनी तक्रारीत नोंद केली आहे. सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून दोघेजण चोरी (Theft) करताना दिसत आहे. यामुळे दुकान मालक गुंजाळ यांनी डोक्यालाच हात लावला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लाखोंच्या मुद्देमालाची चोरी ?
सदर चोरीच्या प्रकरणात 1 लाख 83 हजार 700 रुपयांच्या सोळा मोटारी, नवीन पितळी बुश 65 हजार रुपये, जुने स्क्रॅप बुश 70 हजार रुपये आणि रोख रक्कम 50 हजार रुपये असा एकूण 3 लाख 68 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचा दावा दुकान मालक दिलीप गुंजाळ यांनी केला आहे. मात्र, शहर पोलिसांनी केवळ 55 हजार रुपयांची नोंद केली आहे. यामुळे पोलिसांच्या कारभारावर शंका व्यक्त केली आहे.