Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखशाश्वत शेतीकडे वाटचाल

शाश्वत शेतीकडे वाटचाल

टोमॅटोचे आलेले प्रचंड पीक, वाढती आवक आणि कमी मागणी या सूत्रानुसार टोमॅटोचे भाव कोसळलेे. अनेक शेतकर्‍यांनी काढणीचा आणि वाहतूकीचा खर्च न परवडल्याने टोमॅटो रस्त्यात फेकून दिले. कांद्याच्या भावाची सुद्धा फारशी समाधानकारक स्थिती दिसत नाही. प्रती एकरी वाढणारा उत्पन्नाचा खर्च आणि सरासरी कांद्याला मिळणारा भाव हे गणित ऊणेे मध्येच जाते. गेल्या काही महिन्यात झालेला प्रचंड पाऊस व त्याने केलेले शेतीचे नुकसान हे सगळे जाणून आहेतच. आशेवर जगणार्‍या शेतकर्‍याने अशा परिस्थितीतही धीर धरत मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. वेळ बदलेल, जी काही हातात आलेली कृषी मालाची आवक आहे त्याला थोडाफार भाव मिळेल, या आशेवर तो जगत राहिला. जिथे माल हातात आला, तिथे भाव कोसळले आणि समस्या तशाच राहिल्या. अनेक शेतकर्‍यांचे हे असेच झाले. मात्र, जिल्हाभरात काही शेतकर्‍यांनी वेगळे प्रयोग केले. कुठे नैसर्गिक शेती करीत, कुठे जैविक शेती करत, कुठे फळांची शेती करत तर कुठे प्रायोगिक शेती करत विपरित परिस्थितीतही तग धरला. देशदूतची टीम अशाच काही तरुण प्रायोगिक शेतकर्‍यांना गेल्या काही दिवसात भेटली. सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात ज्ञानेश्वर रेवगडे आणि मखमलाबादमधील हितेश पटेल यांनी केलेला नैसर्गिक शेतीचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. रसायन विरहित शेती करत पारंपरिक पद्धती वापरत एकाच प्लॉटमध्ये अनेक आंतरपीक घेत त्यांनी चांगले यश कमविले. एका आळीत कारल्याचे वेल, वेलाच्या खाली कोबी, कोबीच्या अंतरामध्ये वांगी, गिलके, शेंगा असे वेगवेगळ्या कालावधीने कापणीला आलेल्या पिकांनी त्यांना सातत्याने बाजारपेठ दिली. या तरुण शेतकर्‍यांचा गट बनवत या जोडीने त्याची वितरण व्यवस्था देखील तयार केली. प्रतिसाद सध्या धिम्यागतीने असला तरी हा प्रयोग आश्वासक आहे. मालेगाव तालुक्यातील दहिदी गाव येथे रमेश कचवेपाटील यांनी माळरानावर फुलविलेली ड्रॅगन फुडची शेती व त्यासोबत विविध फळ शेती हा प्रयोग देखील शेतकर्‍याला उभारी देतो. उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करत विविध फळ झाडे लावत हा उपक्रम यशस्वी सुरू आहे. हरसूल तालुक्यातील निरगुडे शिवारातील येथील अंबादास भोये या शेतकर्‍याने मानधनावरील शिक्षकी व्यवसाय सोडून शेतीकडे परत वळत दहा हजार आंब्याची झाडे लावत या भागात वेगळा पायंडा पाडला. या आंब्याला शेजारील राज्यांमध्येही बाजारपेठ मिळाली. पेठमधील फणसपाडा या गावचे प्रभाकर रामचंद्र भुसारे, या शेतकर्‍याने एसआरटी पद्धतीने भाताची लागवड करत उत्तम पीक काढले आणि त्यांना भावही चांगला मिळाला. अवर्षण-प्रवर्षण असलेल्या चांदवड तालुक्यातील खडकओझर गावातील सिद्धार्थ केदारे या शेतकर्‍याने मुरबाड जमिनीवर अतिशय नियोजनबद्ध फळशेती करत आयुष्यभराची सोय करून ठेवली आणि प्रति एकरी लाखात उत्पन्न घेतले. शेतीच्या या उपक्रमांकडे प्रायोगिक म्हणून जरी बघितले तरी हे यशस्वी झालेले प्रयोग आहेत. यात वेगळेपण होते, ते उत्सुकता, चिकित्सा, धाडस आणि ज्ञान या बळावर टाकलेल्या पावलाचे. या सर्व शेतकर्‍यांनी काहीतरी वेगळे करण्याचे धाडस केले. न डगमगता वेळ देत प्रसंगी भांडवल उभे करत मेहनत घेतली. त्यांच्या वेगळेपणावर त्यांनी विश्वास ठेवला. आणि विपरित परिस्थिती सुद्धा स्वत:साठी अनुकूल बनविली. शेतीचे नियोजन केवळ या हंगामापुरते न करता उतारवयातही आता लावलेली फळ झाड जसे की, चिंचेचे झाड अनेक पिढयांना कसे उत्पन्न देऊ शकते याचा सारासार विचार करत ती झाडे लावत त्याकडे पेन्शनक्रॉप म्हणून बघितले. सर्वसाधारण शेतीला अभाव दिसतो तो नियोजनाचा. चालेल्या प्रघातानुसार एकाने घेतले म्हणून दुसर्‍याने घेतले अशी पिकांची लागवड होत गेली तर आवक आणि मागणी ही गणिते चुकतील आणि ती चुकत आल्याचे आपल्याला दिसते. मात्र, नवीन प्रयोग करत जमिनीची पत राखत त्याचा कार्ब वाढवत शेती केली तर ही जमीन अनेक पिढ्यांना पोसू शकेल. हा विचार या शेतकर्‍यांनी केला. ते शेतकरी यशस्वी होताना दिसत आहेत. जून 2022 मध्ये देशदूतने ‘माती वाचवा’ हा उपक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत हे शेतीचे विविध प्रयोग शोधून काढले आणि ते लोकांसमोर मांडत या वेगळेपणाची, अनोख्या विचाराची तंत्रज्ञानाबरोबरच परंपरागत पद्धतीची कास जर का धरली तर शेतीबरोबरच शेतकरीही वाचेल यात दुमत नाही. शाश्वत शेतीकडे पडणारी ही पावले इतरांनाही प्रोत्साहित करो ही अपेक्षा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या