बीड | Beed
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेला आरोपपत्रातून समोर आले आहे. याबाबत विविध वृत्तवाहिन्यांनी वृत्त दिले आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख या आरोपपत्रातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) म्हणाले की,”ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर पहिल्या तासातच मी मीडियासमोर येऊन बोललो होतो की, या प्रकरणातील मास्टरमाइंड पकडला पाहिजे. ही अतिशय निंदनीय घटना घडली आहे. त्याची स्पष्टता आज होत आहे. मी हे वारंवार सांगत होतो की, याचा मास्टरमाइंड परळीला बसायचा. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दहशत निर्माण केली होती. वाल्मिक कराड परळीत येऊन बसायचा आणि वाल्मिक कराडला सपोर्ट कोणाचा असणार हे जगजाहीर आहे. वाल्मिक कराडने गोरगरीब लोकांना त्रास देणे, त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे आणि आपली दहशत निर्माण करणे, असे प्रकार केले आहेत. हे आरोपपत्र २९ नोव्हेंबरपासून पुढचे घेतले आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीने २८ मे रोजी दाखल केला होता. तो सुद्धा यात घेतला पाहिजे. तो सुद्धा असाच प्रकार आहे. त्यातील जो आरोपी आहे तो सुद्धा यांचाच साथीदार आहे. याठिकाणी सर्व गुंड माफिया फिरत आहेत, ते सुद्धा या प्रकरणात घेतले पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.
तर आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) म्हणाले की,”वाल्मिक कराड हाच या संपूर्ण घटनेचा सूत्रधार आहे .वाल्मिक कराडलाच खंडणी हवी होती. ती खंडणी मिळवण्यासाठी आवादा कंपनीभोवती जाळ विण्याचे काम गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू होते. सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे सगळे बाकीचे प्यादे आहेत .या संपूर्ण प्रकरणाचा ब्रेन वाल्मीक कराडच आहे . दोन नंबरला विष्णू चाटे आणि त्याखाली ही पोर असा क्रम आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सकारात्मकता दाखवली आहे .या तक्रारींची छाननी केल्यानंतर कदाचित यात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे”, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले.
आरोपपत्रात नेमकं काय?
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख आहे. त्यानंतर या आरोपपत्रात विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी नमूद केले आहे. आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरुन वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. हा फोन कराडने २९ नोव्हेंबर रोजी केला होता. त्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचा आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला. ७ डिसेंबरला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता. जो उठेल आणि आपल्या आड येईल त्याला सोडणार नाही असे वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितले होते. वाल्मिक कराडशी बोलणे झाल्यानंतर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या कार्यालयात कॉल केला आणि धमकी दिली होती. पुढे ८ तारखेला सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि आणखी एक गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील एका हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला होता.
पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब
या हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना पाच महत्वाचे साक्षीदार सापडले. पाचही गोपनीय साक्षीदार आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराड विरोधात पुरावे गोळा केले. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा तपास एकत्रित करण्यात आला.