नाशिक | प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद पडली आहे. उत्तम प्रतिसाद मिळूनही विमानसेवा बंद पडल्यामुळे नाशिककरांची मोठी गैरसोय झाली आहे. नाशिकमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेट देत असतात यादृष्टीने लवकरात लवकर विमानसेवा सुरु करावी अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदीय हिवाळी अधिवेशनात केली.
खा. डॉ. पवार म्हणाल्या की, माझ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये नाशिक जिल्ह्यात ओझर एअरपोर्ट हे अत्याधुनिक एअरपोर्ट आहे. त्या अनुषंगाने नाशिकमधून सध्याला अहमदाबाद आणि हैद्राबादला विमानसेवा केली जात आहे.
जेट एअरवेजची सेवा उत्तम प्रतिसादात सुरु होती. मात्र, जेट एअरवेज आर्थिक अडगळीत अडकल्यानंतर नाशिक दिल्ली विमानसेवा ठप्प झाली आहे. या गोष्टीला जवळपास वर्ष होत आले आहे.
नाशिकमध्ये सध्याच्या स्थितीत एअर कंनेक्टिविटी खूप गरजेची आहे. नाशिकमधील उद्योग असेल किंवा पर्यटन असेल यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही विमानसेवा अतिशय महत्त्वाची आहे.
नाशिक धार्मिक क्षेत्र आहे आणि त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे त्रंबकेश्वर येथे आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक भाविकांची संख्या मोठी आहे.
नाशिकच्या प्रवाशांसह धुळे, जळगाव, नंदुरबार येथील प्रवाशांना देखील याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. चांगला प्रतिसाद मिळतो आहे, शिवाय येथील कार्गो सेवाही उत्तम सुरु होती. विमान कंपन्यांना आर्थिक हातभार कार्गो सेवेतून मिळत असल्यामुळे हि सेवा लवकरात लवकर सुरु होणे गरजेचे असल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.