संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर व अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या अस्तरीकरणाचे काम चालू असून हे काम स्थानिक शेतकर्यांना विश्वासत घेऊनच करा, अशा सूचना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जलसंपदा अधिकार्यांना दिल्या आहेत. निळवंडे कालव्याच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात सोमवारी खासदार वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली निळवंडे पाटपाणी कृती समितीच्यावतीने संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पोटचार्यांचा प्रश्न, कालव्यांचे सुरु असलेले अस्तरीकरणाचे काम हे त्या भागांतील स्थानिक शेतकर्यांना विश्वासात घेऊनच कऱण्यात यावे. तसेच ज्या भागातील शेतकरी उंच भागावर किंवा कालव्यापासून जास्त अंतरावर आहे त्यांच्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे थेट कालव्यातून पाणी उचलण्याची परवानगी द्यावी, पोटचार्या बंदिस्त स्वरूपात न करता खुल्या पद्धतीने झाल्या पाहिजे की जेणेकरुन भूजल पातळीमध्ये वाढ होईल, आवर्तन कालावधीमध्ये गावतळे पूर्ण क्षमतेने भरून द्यावे, याकाळात वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये याकरिता देखील जलसंपदा विभागाने वीजवितरण कंपनीला लेखी आदेश द्यावेत, असे खासदार वाकचौरे यांनी अधिकार्यांना सांगितले.
या बैठकीस परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विशाल यादव, निळवंडे कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, नायब तहसीलदार लोमटे, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब जवरे, ज्ञानेश्वर वर्पे, माधव कानवडे, संजय गोपाळे, उत्तम घोरपडे, सर्व पदाधिकारी, युवा उद्योजक अमोल बोर्हाडे, अशोक सातपुते, संजय फड आदींसह या भागातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.