दिल्ली । Delhi
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हे हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईमुळे देशभरातून भारतीय सैन्याचं कौतुक होत असून, जवानांचे धैर्य व देशभक्तीचे सर्वत्र गौरव होत आहे.
या एअर स्ट्राईकदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत सातत्याने बैठक घेतली. केंद्र सरकारच्या संपूर्ण पाठिंब्याने सैन्याने हा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला ठोस इशारा दिला. ही कारवाई म्हणजे केवळ सैनिकी प्रतिकार नसून, देशाच्या सुरक्षेप्रती असलेली कटिबद्धता स्पष्ट करणारा निर्णायक पाऊल आहे.
दरम्यान, सैन्याच्या शौर्याचे देशभरातून कौतुक होत असताना काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, “ज्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले, त्यांना आम्ही त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवून उत्तर दिलं. त्यांनी आमच्या हिंदूंना मारलं, तर पंतप्रधान मोदींनी त्यांच्याच समाजातील बहीण पाठवून त्यांना धडा शिकवला.”
या वक्तव्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर विजय शाह यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आपला हेतू चुकीचा नव्हता, असं स्पष्ट केलं. अशातच आता मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देवडा यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
https://x.com/SupriyaShrinate/status/1923289768378454524
या व्हिडिओमध्ये देवडा म्हणताना दिसत आहेत, “देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक आहेत. संपूर्ण देश मोदींच्या पायाशी नतमस्तक आहे. त्यांनी दिलेलं उत्तर अभूतपूर्व आहे आणि त्याचं जितकं कौतुक केलं जावं, तेवढं कमीच आहे.”
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, सैन्य देशासाठी समर्पित असते, कोणत्याही नेत्याच्या चरणी नव्हे. देवडा यांनी आपलं विधान स्पष्ट करत सांगितलं की, “मोदी यांच्या धाडसी निर्णयामुळेच पहलगाम हल्ल्याचा बदला घेता आला. आज देशाची सीमा अधिक सुरक्षित आहे, याचे श्रेय मोदींनाच जाते.” मात्र, त्यांचं वक्तव्य कितपत योग्य आहे यावर आता राजकीय व सामाजिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
सैन्याच्या पराक्रमावर सगळा देश अभिमान व्यक्त करत असतानाच, काही राजकीय नेत्यांच्या अतिरंजित आणि संवेदनशील विधानांमुळे वाद निर्माण होत आहे. ही वक्तव्यं देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या जवानांच्या सन्मानावर आणि त्यांच्यावरील जनविश्वासावर परिणाम करू शकतात, असं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे.