Monday, May 27, 2024
Homeनगरसंस्था बंद पाडण्यापलिकडे तुम्ही काय दिवे लावले?

संस्था बंद पाडण्यापलिकडे तुम्ही काय दिवे लावले?

लोणी |वार्ताहर| Loni

तुम्ही संस्था बंद पाडण्यापलिकडे काय दिवे लावले? अशा शब्दांत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नाव न घेता टीका केली. याचवेळी त्यांनी सध्या बोलण्यासारखी परिस्थिती नाही, असे म्हणत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.

- Advertisement -

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शालिनीताई विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील होते. यावेळी प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, ट्रक्स वाहतूक संस्थेचे चेअरमन नंदकिशोर राठी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, फळे भाजीपाला संस्थेच्या चेअरमन गीताताई थेटे, बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, शांतिनाथ आहेर, ट्रक्स वाहतूक संस्थेचे व्हा.चेअरमन सुनील जाधव, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पाण्याच्या प्रश्नावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा संदर्भ देऊन खा. सुजय विखे पाटील म्हणाले, तुम्ही संस्था बंद पाडण्यापलिकडे काय दिवे लावले? पाण्याच्या संघर्षात तुमचे योगदान काय? शेतकर्‍यांनी उसाची लागवड करावी. पाणी कमी पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका, असा विश्वास शेतकर्‍यांना यावेळी त्यांनी दिला.

डॉ. विखे कारखान्याने 2 हजार 700 रुपये प्रति टन भाव देऊन विरोधकांचे तोंड बंद केल्याचे सांगताना त्यांनी येत्या हंगामात जिल्ह्यात उच्चांकी भाव देणार असल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असून कार्यकर्त्यांनी आंदोलकांना भेटा, त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा ना. विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण नसताना 50 टक्के शिक्षण फी मध्ये सवलत दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळात अत्यल्प ऊस उपलब्ध असताना अनेकदा ऊस गळीत हंगाम यशस्वी करून दाखवला होता. हे वर्ष आव्हानात्मक आहे. ऊस पुरवठा करणार्‍या यंत्रणेने अधिक चांगले काम करण्याची गरज आहे.

डॉ.भास्करराव खर्डे, कामगार नेते ज्ञानदेव आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष कैलास तांबे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष सतीश ससाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल पाटील, सर्व संचालक, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीला पाच किलो साखर मोफत

विखे पाटील कुटुंबाच्यावतीने शिर्डी विधानसभा मतदार संघातील व प्रवरा परिसरातील सर्व गावांतील रेशनकार्ड धारक कुटुंबाला दिवाळी सणानिमित्त पाच किलो साखर मोफत देणार असल्याची घोषणा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. प्रत्येक गावात ही साखर पोहच केली जाणार असून ती फक्त कुटुंबातील महिलेलाच मिळणार आहे. येत्या चार-पाच दिवसांत वाटप सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या