Sunday, September 8, 2024
Homeनगरअजित पवार यांच्या नवीन समिकरणामुळे विकास अधिक गतीमान - खा. डॉ. विखे

अजित पवार यांच्या नवीन समिकरणामुळे विकास अधिक गतीमान – खा. डॉ. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांचे सहकारी पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या मुद्यावर सरकारमध्ये सामील झाले आहेत. या नव्या समीकरणामुळे विकास गतिमान होईल. नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी भाजपाचे वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आघाडीतील मित्र पक्षांशी विचार विनिमय करून निश्चित करतील. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करणे, हे आपले काम आहे, असे मत खासदार डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

खासदार डॉ. विखे यांनी रविवारी नगरला जनता दरबार आयोजित केला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा. विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 9 वर्षांच्या काळात देशाच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला गती दिली आहे. मोदींच्या नेतृत्वावर जनसामान्यांचा जनतेचा विश्वास तर आहेच पण विरोधी पक्षात असलेले अनेक गट मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपासोबत येत आहेत. नव्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्यातील कामे करताना वरिष्ठ पातळीवर समन्वय ठेवूनच काम केले जाईल. भाजपामध्ये वरिष्ठांनी घेतलेली भूमिका ही धोरणात्मक असते.

राज्य शासनाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान हाती घेतले. जिल्ह्यात या अभियानांतर्गत उच्चांकी संख्येत लाभार्थ्यांना लाभ पोहोचविला. हे काम अद्यापि सुरू आहे. लवकरच शासन आपल्या दारी या उपक्रमाचा जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा जिल्ह्यात होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या तारखा लवकरच निश्चित होणार आहेत.

काँग्रेसचे नेतेही संपर्कात

काँग्रेसच्या नेतेमंडळींच्या संपर्कात राहण्याची गरज नाही. उलट तेच अनेकजण भाजपाच्या वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील काही नेतेही भाजपामध्ये येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, कोणाचे नाव त्यांनी घेण्यास स्पष्ट नकार दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या