श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मुळा-प्रवरात एक चांगला काळ काढला, खेळीमेळीत गेला. आता एक सहकारी कारखाना इकडे गेला तर तिकडे आरोप सुरू झाले. आरोप आमच्या पाचवीला पुजलेले आहे. आरोप कितीही केले तरी एकही माईचा लाल आमच्या परिवारावर केलेला भ्रष्टाचाराचे आरोप आजपर्यंत सिध्द करु शकला नाही. त्यामुळे कोणी पाच कोटी, कोणी दोन कोटी खाल्ले यावर लोक हसतील. त्यामुळे योग्य वेळ आली की उत्तर देईल, असे प्रतिपादन मुळा-प्रवराचे माजी अध्यक्ष खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
मुळा-प्रवरा वीज सोसायटीची वार्षिक सभा येथील मातोश्री सांस्कृतिक भवनात संस्थेचे प्रशासक तथा राहाता येथील सहकारी संस्था सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही.टी. पाटील उपस्थित होते.
एखादी सहकारी संस्था राजकारणामुळे कशी संपुष्टात येते याचे सर्वात मोठे जिवंत उदाहरण म्हणजे मुळा-प्रवरा वीज संस्था आहे, संस्थेच्या हितासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जे-जे राजकीय मंडळी असतील त्यांनी आपआपल्या परीने योगदान दिलेले आहे. काहींनी अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी तर काहींनी अडचणीत आणण्याची जबाबदारी पार पाडली. सहकार संपविण्यात किंबहुना सहकारात राजकारण आल्यानंतर सर्वात मोठी हानी मुळा-प्रवरा जाण्याने राहाता, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील शेतकर्यांची, सभासदांची झाली. तर एमएसईबी च्या विविध अडचणींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची झाली.
अजूनही सहकारातील राजकारण थांबायले तयार नाही. येथे वेगळ्या विचारांचे लोक राजकारणात आहे. कोणी मनाचा मोठेपणा दाखवतात. तर कोणी जुन्या गोष्टी जावून देतात. तर काही लोक त्या मनाच्या मोठेपणाचा विर्पयास करतात. राहुरी कारखाना चालविला तर आमच्यावर आरोप होतात. मात्र ज्यांच्यासाठी आम्ही भूमिका घेतली तो सभासद, कर्मचारी आमच्या बाजूने उभे राहत नाही हा आजचा सहकार आहे. अशी खंत व्यक्त करुन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार टिकविण्याची भूमिका घेतली. संस्थेच्या लढाईत 8 वर्ष त्यांनी संघर्ष केला. हा संघर्ष यापुढेही चालू ठेवू अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
मुळा- प्रवरा वीज संस्थेसाठी आपले प्रयत्न चालू असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मुळा-प्रवरा संस्थेबाबत सकारात्मक भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही संस्था पुन्हा कशी उभारेल यासाठी प्रयत्न करीत आहोत. राजकारण व सहकार हे दोन वेगवेगळे पैलू असले पाहिजे. सहकार संपला तर शेतकरी व सामान्य माणूस संपेल, असेही डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
राजकारण संपले तर कोणी संपत नाही. राजकारणासाठी सहकार संपविण्याचे पाप कुणी करु नये. त्यांना आपल्या पापाची परतफेड परमेश्वर याच आयुष्यात करायला लावेल, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.
यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक श्री. पाटील यांनी विषय पत्रीकेवरील विषयांचे वाचन केले तर सर्वांच्या संमतीने विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आल्याचे प्रशासक श्री. खेडकर यांनी जाहीर केले.
यावेळी कर्मचार्यांच्या हक्कासाठी लढणारे संस्थेचे माजी कर्मचारी हरिभाऊ तुवर यांनीही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना निवेदन देवून संस्था पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
या सभेस संस्थेचे माजी संचालक अंबादास ढोकचौळे, इंद्रनाथ थोरात, जलीलखाँ पठाण, सिध्दार्थ मुरकुटे, संजय छल्लारे, दिपक शिरसाठ, अनिल भट्टड, मच्छिंद्र अंत्रे, चित्रसेन रणवरे तसेच भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पटारे, नानासाहेब पवार, अभिषेक खंडागळे, विठ्ठल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
मुळा-प्रवरा पुन्हा सुरु करा – छल्लारे
यावेळी संस्थेचे माजी संचालक, शिवसेनेचे संजय छल्लारे यांनी खा. सुजय विखे पाटील यांच्याकडे ही संथा पुन्हा चालू करण्याची मागणी केली. ते म्हणाले, राज्यात व केंद्रात आपले सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री देवेंद्र फडणविस आपल्यास सहकार्य करतात तर ही संस्था पुन्हा सुरु करावी. तुम्ही व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरविले तर अशक्य काही नाही. त्यामुळे रोजगार गेलेल्या 1500 ते 1700 कामगारांच्या हिताचा विचार करुन संस्था पुन्हा सुरु करावी.
श्रीरामपूर सुधारण्यासाठी पक्ष बदलून चालणार नाही
श्रीरामपूर जर सुधारायचे असेल तर पक्ष बदलून चालणार नाही. लोकांची मानसिकता बदलावी लागेल व माणसेही बदलावी लागतील. माझी विनंती आहे सगळ्यांनी मिळून संस्थेची जी वाटचाल राहिली या वाटचालीचा अनुग्रह करुन संस्थेच्या इतिहासात ज्या गोष्टी घडल्या, किती संघर्ष झाला, कोण चुकले, कोण योग्य होते याचा विचार समाजात पोहचविला गेला पाहिजे. त्या विचाराचा आधार घेवून भविष्यात राजकीय परिस्थितीत योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉ. सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.