Saturday, July 27, 2024
Homeनगरनगर, शिर्डीचा खासदार आज ठरणार

नगर, शिर्डीचा खासदार आज ठरणार

मतमोजणीची तयारी पूर्ण || दुपारी एकनंतर कल स्पष्ट होण्याची शक्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

18 व्या लोकसभेत नगर जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे आज स्पष्ट होणार आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असणारी धावपळ आज जाहीर होणार्‍या निकालानंतर संपणार आहे. जिल्ह्यातील मतदार राजाने कौल कोणाला दिला हे दुपाारी एकनंतर स्पष्ट होण्यास सुरू होणार आहे. दरम्यान लोकसभेच्या नगर आणि शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दुपारी एकनंतर जिल्ह्यातील कल स्पष्ट होणार असल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

13 मे रोजी मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे नगर एमआयडीसीच्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये नजरबंद करण्यात आलेले आहेत. याठिकाणी गेली काही दिवसांपासून पोलिसांसह लष्करी जवानांचा जागता पहारा होता. देशात सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यावर आज 4 जूनला एकाचवेळी देशासह राज्यातील आणि नगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, नगर आणि शिर्डीच्या मतदारसंघाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून सोमवारी प्रत्यक्षात मतमोजणीची रंगित तालिम घेण्यात येऊन निवडणूक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. या मतमोजणीसाठी 900 कर्मचार्‍यांसह राखीव कर्मचार्‍यांची तजवीज करण्यात आलेली असून काल दिवसभर मतमोजणी परिसरात अधिकारी- कर्मचारी, पोलीस बळाची धावपळ सुरू होती.

आज होणार्‍या मतमोजणीत कोणत्याही प्रकारे त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. आज पहाटेपासून मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार्‍या कर्मचारी आणि अधिकारी यांना मोजणी कक्षाकडे पाचारण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी ही विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 84 टेबल आहेत. यातील दोन टेबल हे टपाली मतदान मोजण्यासाठी राहणार आहे. या दोन्ही मतदारसंघात एकूण 172 टेबल असणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी 16 टेबल असणार आहेत. यामध्ये पोस्टल मतांसाठी दोन टेबल, तर ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. एका टेबलवर 4 कर्मचारी असतील.

यामध्ये पर्यवेक्षक, सहायक, मायक्रो ऑब्झर्व्हर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहेत. उमेदवार आणि त्यांचे अधिकृत प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधी यांना प्रवेश मिळणार आहे. निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाच्या उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाशिवाय व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यासह ज्यांना आवश्यक आहे, तसेच निरिक्षक वगळता अन्य सर्वांना मोबाईल बंदी करण्यात आलेली आहे. नगर लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवार भवितव्य अजमावत आहेत. असे असले तरी खरी लढत महायुतीचे खा. डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात आहे. शिर्डीमध्ये 20 उमेदवार असून येथे तिरंगी लढत आहे.

मतमोजणी परिसर ‘नो व्हेईकल झोन’
मतमोजणीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता हा परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ (वाहन विरहीत क्षेत्र) घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत. नागापुर एमआयडीसी येथे येण्या-जाण्याच्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. साईरत्न हॉटेल चौक – एलअ‍ॅण्डटी कॉलनी-पारस कंपनीपर्यंत जाणारा रस्ता, तसेच वखार महामंडळ लगतच्या चारही बाजुचे रस्ते ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आले आहेत. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सुमारे 600 पोलीस अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक दोन, पोलीस उपअधीक्षक चार, पोलीस निरीक्षक 19, सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक 45, पोलीस अंमलदार 468, ‘आरसीपी’चे तीन प्लाटून यांचा समावेश राहणार आहे. मोतमोजणी सुरू असताना व पूर्ण झाल्यानंतर कार्येकर्ते, नागरिकांकडून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकण्याची शक्यता असते. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले आहे. येथील सायबर पोलीस ठाण्यात एक अधिकारी व तीन अंमलदार यांच्या पथकाचे सोशल मीडियावर लक्ष राहणार आहे.

पोस्टलपासून मतमोजणीला प्रारंभ
सकाळी आठ वाजता पोस्टल मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. आतापर्यंत पोस्टलने 3944 मतदारांचे मतदान आले असून त्यात नगरमध्ये 2 हजार 829 तर शिर्डीचे 1 हजार 115 मतदानाचा समावेश आहे. तर कर्मचार्‍यांचे पोस्टल मतदान 5 हजार 517 आतापर्यंत मिळाले आहे. त्यात नगरचे 2 हजार 670 तर शिर्डीचे 1 हजार 847 मतदाराचे मतदान पोहोच झाले आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी पोस्टल मतदान आणण्याची व्यवस्था करण्यात आली असून तशा सुचना पोस्ट विभागाला देण्यात आल्या आहेत. या पोस्टलच्या मतमोजणीसाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 17 पर्यवेक्षक, 34 मदतनीस, 17 सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती नगर मतदारसंघासाठी तर शिर्डीसाठी 15 पर्यवेक्षक, 30 मदतनीस, 15 सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

अशा आहेत मतमोजणीच्या फेर्‍या
विधानसभा मतदार संघनिहाय असणार्‍या व मतदान केंद्रनिहाय होणार्‍या मतमोजणी फेर्‍या याप्रमाणे असतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 216 अकोल मतदारसंघातील307 मतदान केंद्र 22 फेर्‍या, संगमनेर 278 मतदान केंद्र 20 फेर्‍या, शिर्डी 270 मतदान केंद्र 20 फेर्‍या, कोपरगाव 272 मतदान केंद्र 20 फेर्‍या, श्रीरामपुर 311 मतदान केंद्र 23 फेर्‍या तर नेवासा 270 मतदान केंद्र 20 फेर्‍या होणार आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव पाथर्डी 365 मतदान केंद्र 27 फेर्‍या, राहुरी 307 मतदान केंद्र 22 फेर्‍या, पारनेर 365 मतदान केंद्र 27 फेर्‍या, अहमदनगर शहर 288 मतदान केंद्र 21 फेर्‍या, श्रीगोंदा 345 मतदान केंद्र 25 फेर्‍या तर कर्जत-जामखेड 356 मतदान केंद्र 26 फेर्‍या होणार आहेत.

मतमोजणी परिसराला छावणीचे स्वरूप
एमआयडीच्या वखार महामंडळाच्या गोडावून परिसारात असणार्‍या परिसारात सोमवारी दिवसभर शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची गर्दी होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदाबेस्त होता. गोडावूनच्या अलिकडील मोकळे मैदान असणार्‍या परिसरात चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. या परिसरात असणार्‍या दुकानदार, कंपनीमधील कर्मचारी यांना एमआयडी पोलीसांच्यावतीने ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. या ओळखपत्राच्या आधारे त्यांना परिसरात प्रवेश करता येणार आहे.

नगरचे उमेदवार
उमाशंकर यादव (बसपा), नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट), डॉ. सुजय विखे पाटील (भाजप), आरती हालदार (प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष), कालीराम पापळघट (भारतीय नवजवान सेना), डॉ. कैलास जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), रवींद्र कोठारी (राष्ट्रीय जनसंघ), दत्तात्रय वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पक्ष), दिलीप खेडकर (वंचित बहुजन आघाडी), भगवान गायकवाड (समता पक्ष), मदन सोनवणे (राईट दू रिकॉल पक्ष), रावसाहेब काळे (बहुजन मुक्ती पक्ष), भाऊसाहेब वाबळे (भारतीय जवान किसान पक्ष), शिवाजीराव डमाळे (सैनिक समाज पक्ष), अमोल पाचुंदकर (अपक्ष), महेंद्र शिंदे (अपक्ष), मच्छिंद्र गावडे (अपक्ष), गंगाधर कोळेकर (अपक्ष),नवशाद शेख (अपक्ष), प्रविण दळवी (अपक्ष), सुर्यभान लांबे (अपक्ष), अनिल शेकटकर (अपक्ष), अ‍ॅड. महंमद जमीर शेख (अपक्ष), बिलाल गफूर शेख (अपक्ष), गोरख आळेकर (अपक्ष).

शिर्डीचे उमेदवार
भाऊसाहेब वाकचौरे (उबाठा), रामचंद्र जाधव (बसपा), लोखंडे किसन (शिवसेना), उत्कर्षा रुपवते (वंचित ), अ‍ॅड. नितीन पोळ (बहुजन भारत पक्ष), भारत संभाजी भोसले (समाज पाटीर्र्), राजेंद्र वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पक्ष), अभिजीत पोटे (अपक्ष), अशोक आल्हाट (अपक्ष), नचिकेत खरात (अपक्ष), विजयराव खाजेकर (अपक्ष), गंगाधर कदम (अपक्ष), चंद्रकांत दोंदे (अपक्ष), प्रशांत निकम (अपक्ष), गोरक्ष बागुल (अपक्ष, टीलर), कलय्या स्वामी रवींद्र (अपक्ष), सतिष पवार (अपक्ष), अ‍ॅड. सिद्धार्थ बोधक (अपक्ष), संजय भालेराव (अपक्ष).

- Advertisment -

ताज्या बातम्या