Wednesday, December 4, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे गटाच्या चार खासदारांवर कारवाईचा इशारा

ठाकरे गटाच्या चार खासदारांवर कारवाईचा इशारा

मुंबई | प्रतिनिधी

महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी दिला.

- Advertisement -

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबत आपण कायदेशीर सल्ला घेत असून याविषयी लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचे शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसप्रणित आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.त्यांच्या आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाच्या मतदानावेळी अनुपस्थित होते.

लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोद पद खासदार भावना गवळी यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजित केलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी गवळी यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या व्हीपचे उल्लंघन केले, असे शेवाळे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयकावरील मतदानाच्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते, ही लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर हे तर दिल्लीमध्ये असूनही ते सभागृहात आले नाहीत. महिलांचा अवमान करणाऱ्या या खासदारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असे राहुल शेवाळे म्हणाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या