Wednesday, July 24, 2024
Homeनगरआता दुसरी लढाई घाटमाथ्यावरील पाणी अडविण्याची - खा. लोखंडे

आता दुसरी लढाई घाटमाथ्यावरील पाणी अडविण्याची – खा. लोखंडे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

पाच दशकांहून अधिक काळ रखडलेले निळवंडेचे पाणी जिरायत भागातील शेतीला उपलब्ध करून देण्याची लढाई जिंकली. आता घाटमाथ्यावरील पाणी अडवून मुळा-प्रवरासह गोदावरीच्या खोर्‍यात आणण्यासाठी साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आपण दुसरी लढाई सुरू केली आहे. यासाठी घाटमाथा पाणी कृती समितीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. घाटमाथ्यावरील पाणी पुर्वेकडे आल्यास नगर-नाशिकसह मराठवाड्याचाही पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास खा. सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला.

दिवसेंदिवस वाढणारी पाण्याची गरज व समन्यायी कायद्याने पाण्याची प्रचंड तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी घाटमाथ्यावरून कोकणात वाहून जाणारे पाणी पश्चिमेला गोदावरीसह अन्य उपनद्यांच्या खोर्‍यात उतरवण्याशिवाय पर्याय नाही, असे ठाम मत खा. लोखंडे यांनी व्यक्त केले.

साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार लोखंडे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, नितीन कापसे, विजय काळे, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंते हरिश्चंद्र चकोर, जी. जी. थोरात, डॉ. साईनाथ आहेर, निळवंडे कृती समीतीचे नानासाहेब शेळके, विठ्ठल घोरपडे, कावेरी नवले, रामभाऊ राहाणे, बाजीराव दराडे, बाळसाहेब पवार, राजेंद्र देवकर आदी उपस्थित होते. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठीच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन तसेच केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रश्नावर सर्व लोकप्रतिनिधींनाही बरोबर घेणार असून आता आपले पुढील लक्ष घाटमाथ्यावरील पाणी वळवण्याकडेच राहाणार असल्याची ग्वाही दिली. घाटमाथ्यावरील पाणी पुर्वेकडे वळवणे शक्य असून सरकारने निर्णय घेतल्यास गोदावरी खोर्‍यात 100 टीएमसीपेक्षा अधिक पाणी उपलब्ध होईल त्यासाठी 25 ते 30 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. केंद्राच्या मदतीने ही योजना यशस्वी होऊ शकेल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंते जी. जी. थोरात व हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या