मुंबई | Mumbai
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नवी दिल्लीतील (New Delhi) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलतांना “ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena UBT) दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यानंतर आज सकाळी माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांच्या सडकून टीका करत चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की,” नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि नमकहराम बाई आहे. हा शब्द कापू नका, दोन्ही शब्द असंसदीय नाहीत. साहित्य संमेलनामध्ये मराठी संस्कती, साहित्य, मराठी भाषा आणि विस्तार यावर चर्चा झाली पाहिजे. देशाच्या राजधानीत महाराष्ट्रातील (Maharashtra) नेत्यांवर राजकीय चिखलफे करण्यासाठी भरवलं का? नीलम गोऱ्हेंचे कालचे वक्तव्य म्हणजे त्यांची विकृती आहे. मला आठवतं की, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ही कोणती बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? हे कोणतं ध्यान आणलं पक्षात? तरीही काही लोकांच्या मर्जीखातर त्या आल्या आणि चार वेळा आमदार झाल्या. आणि जाताना ताटात घाण करून गेल्या. या बाईचं विधान परिषदेचं कर्तृत्व समजून घ्यायचं असेल तर पुण्याचे गटनेते होते अशोक हरनावळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या. मग हे मर्सिडिज प्रकरण कळेल, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”नाशिकच्या विनायक पांडे यांना उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले. तुम्ही ते विनायक पांडे यांना जाऊन विचारा. त्या विनायक पांडे यांनी कसे तरी ते पैसे वसुल केले. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत. आम्ही दूर झालो, पण तुम्ही अशा प्रकारे विधानं करता. ज्यांनी तुम्हाला आमदार केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
तसेच “मराठी साहित्य महामंडळाने (Marathi Sahitya Mahamandal) माफी मागितली पाहिजे. ज्या कोणी उषा तांबे बाई आहेत त्या मला माहिती नाही. त्यांचं साहित्यात काही, योगदान आहे मला माहिती नाही, त्यांनी माफी मागायला हवी. साहित्य महामंडळाकडे खंडणी घेऊन संमेलन भरवले जाते. सरकारने दोन कोटी रूपये दिले की त्यातील २५ लाख काढून घ्यायचे आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायची. कार्यक्रम हे महामंडळ ठरवतात आणि आयोजक हे सतरंज्या उचलायला असतात,” असेही संजय राऊत म्हणाले.