नाशिक | Nashik
शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) येत्या १६ एप्रिल रोजी नाशिकमधील (Nashik) गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन लॉन्स येथे विभागीय शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात संध्याकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर शिबिराचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना विविध विषयांवर भाष्य करत या शिबिरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे न ऐकलेले भाषण दाखविणार असल्याचे म्हटले. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या गोप्यस्फोटाला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी राऊत म्हणाले की, “येत्या १६ एप्रिलला मनोहर गार्डन लॉन्स येथे शिवसेनेचे शिबिर होणार आहे. दिवसभर हे शिबिर होणार असून, या शिबिरासाठी सर्व विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते (Worker) एकत्र येणार आहेत. तसेच अनेक विषयांवर चर्चा, मंथन, चिंतन होणार असून, सकाळी ९.३० वाजता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. तर सायंकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे या शिबिरासाठी (Camp) उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,” तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकात खैरे आणि जेष्ठ वकील असीम सरोदे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. या शिबिरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे कधीही न ऐकलेले भाषण दाखविण्यात येणार आहे. एकप्रकारे बाळासाहेब यांची या शिबिराला उपस्थिती असेल. प्रत्येक पदाधिकाऱ्याने शिबिरासाठी वाहून घेतले आहे. ठाकरे परिवार आणि नाशिकचे (Nashik) प्रेम असं आहे की, ‘मुंबई बाहेरचे पहिले शिबिर नाशिकमध्ये असणार आहे”, असे राऊत यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटलांना राऊतांचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे, पण घेतलं जात नाही असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला चिमटा काढला होता. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी अजिबात चिंता करु नये. आमच्याकडे उमेदवार आहेत. त्यांनी अमेरिकेतल्या तुलसी गॅबॉर्ड ज्या आहेत त्यांनी ईव्हीएमबाबत भाष्य केले आहे. तुलसी गेबॉर्ड यांनी वॉशिंग्टनमध्ये सांगितलं की, ‘ईव्हीएम हॅक होऊ शकतं. त्या अमेरिकेच्या इंटलिजन्सच्या प्रमुख आहेत. महाराष्ट्रात कसा विजय मिळवला आहे हे मोदींच्या मैत्रिणीने सांगितलं आहे. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत”,असे राऊत यांनी म्हटले. तसेच सत्तेसाठी आम्हाला अमित शाह यांचे पाय चाटायची गरज नाही, असेही ते म्हणाले.