आईची उमेदवारी काँग्रेस ठरवेल
अहमदनगर (प्रतिनिधी)– राजकारणात प्रत्यक्ष कागदावर असलेले संख्याबळ आणि राजकीय गणितात फरक असतो, असे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काहीही घडू शकते असे स्पष्ट करत खा. डॉ. सुजय विखे यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले. आई शालिनीताई या काँग्रेस पक्षाच्या सदस्या असल्याने त्यांच्या उमेदवारीचा निर्णय तो पक्ष घेईल असा सांगत त्यांनी विखे यांच्या उमेदवारीचा सस्पेन्सही कायम ठेवला.
31 डिसेंबरला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. डॉ. विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता अध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. खा. डॉ. सुजय विखे आणि माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात आहे. मातोश्री शालिनीताई या काँग्रेसच्या सदस्या असून विद्यमान अध्यक्ष आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवदी, काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीचे संख्याबळ कागदावर जास्त आहे. भाजपचा अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यसभेत बहुमत नसतानाही अनेक कायदे पारीत करण्यासाठी बहुमत मिळविले असा दाखला देत खा. विखे यांनी जिल्हा परिषदेत काहीही घडू शकते असा सूचक इशारा दिला.
महाविकास आघाडीकडे कागदावर संख्याबळ जास्त असले तरी प्रत्यक्ष सभागृहात काहीही घडू शकते. मातोश्री शालिनीताई या काँग्रेस सदस्या असल्याने त्यांच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल. विद्यमान अध्यक्ष शालिनीताई यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला तर काय? असा प्रश्न केला असता डॉ. विखे यांनी तो निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे स्पष्ट केले.
कागदावरचे संख्याबळ आणि प्रत्यक्ष सभागृहातील मतदान यात फरक असतो. 31 डिसेंबरनंतर सगळेच चित्र स्पष्ट होईल असे सांगतानाच खा. विखे यांनी शालिनीताई विखे यांच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवला.
रोहित पवार यांचा अभ्यास कच्चा
राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांचा अभ्यास कच्चा असल्याचे टोमणाही खा. विखे यांनी यावेळी लगावला. एनआरसीबाबत पवार यांनी काल रांगेत उभे राहणे हे दुर्देव असल्याचे म्हटले होते. त्यावरून खा. विखे यांनी हा टोमणा मारला. ते राज्यात राहतात. लोकसभा आणि राज्यसभेत हा कायदा पास झाला आहे. राष्ट्रपतींची सहीही त्यावर झाली आहे. हा कायदा काय आहे, हे रोहित पवार यांना कळाले नाही, त्यामुळे ते असे बोलले असतील असे म्हणत विखे यांनी त्यांनी अभ्यास करण्याची सूचनाही केली.