अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महाविकास आघाडीमधील काँग्रेस हा लाचार पक्ष आहे. राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेला काँग्रेस हा लॉटरी सिस्टममध्ये सत्तेत येऊन बसला आहे.
त्यामुळे ते स्वतःच्या आमदारांकडे कमी आणि मंत्रीपद सांभाळण्यात जास्त व्यस्त आहेत. जनतेच्या प्रश्नांवर मी फिरत असून त्यासाठी बैठका घेतल्या. मात्र, काहीजण माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची माणगी करत आहे.
मग, माझ्या एकट्यावर गुन्हे दाखल करण्यासोबतच पारनेरमध्ये कोविड सेंटरच्या उद्घाटन करण्यासाठी आलेले आरोग्यमंत्री आणि उपस्थित लोकांवर तसेच अन्य ठिकाणी उद्घाटनाला गर्दी करणार्या सर्वांना गुन्हे दाखल करण्याची मागणी करत खा. डॉ. सुजय विखे पाटील विरोधांचा समाचार घेतला.
खा. विखे हे मंगळवारी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका बैठकीसाठी आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खा. विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी के.के. रेंज बाबत पारनेर व राहुरी येथे बैठका घेत आहे.
या बैठकीत कोणतेही सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचे फोटो समाज माध्यमातून व्हररल झाले आहे. त्यानंतर खा.विखेवर विविध स्तरातून टीका होत आहे. याबाबत खा. विखे यांना विचारले असता ते म्हणाले, जेव्हा लॉकडाऊन करा असे सांगत होतो. मात्र कोणी लॉकडाऊन केला नाही.
त्यानंतर मी माझ्या बैठकांना सुरूवात केली. यावेळी गर्दी होत असल्याचे काहींचे म्हणणे असून माझ्यावर जिल्हाबंदीची मागणीही करण्यात येत आहे. ज्यांना माझ्या गर्दीचे फोटो दिसत असतील, त्यांनी जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांच्या कार्यक्रमाचे गर्दीचे फोटो पहावे. त्यांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाला माझ्या बैठकीपेक्षा जास्त गर्दी आहे.
पण सत्तेच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत नाही. मी जनतेच्या कामासाठी फिरतोय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर करा. पण माझ्या एकट्यावर हा गुन्हा करण्यापेक्षा पारनेरमध्ये कोविड हॉस्पिटल उद्घाटनाला आरोग्यमंत्री आले होते.
तेथे उपस्थित असलेल्या सर्वानावर गुन्हा दाखल होणे आवशयक आहे. कर्जत-जामखेडमध्ये तर रोज भूमिपूजन होतात. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावेत. केवळ एका खासदाराला टार्गेट करून उपयोग नाही.
करोनाचा प्रादुर्भाव थांबलाय, असे सरकार म्हणते. प्रशासन म्हणते लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही. जनता ही भीती न बाळगता बाहेर पडते. कोणीही बंधन पाळायला तयार नाहीत.
तीन पक्षाच्या सरकारमध्ये सर्वाचे समाधान होणे अवघड आहे. ज्या तीन पक्षातील नेते समोरासमोर लढले हेच पक्ष सत्तेत एकत्र बसले आहे. विकासकामाच्या दृष्टीकोनातून ज्या खात्याचा मंत्री आहे त्याची विकासकामे होत असून इतरांची होत नाही, याची सुरुवात देखील आता झाली आहे.
हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्रचा विकास थांबणार असल्याचे खा. विखे यांनी सांगितले. राज्याच्या राजकारणात काँग्रेस चार नंबरचा पक्ष आहे. लॉटरी म्हणून ते सत्तेत आहेत. लागलेली लॉटरी कोणी फाडत नाही.
त्यामुळे चौथ्या नंबरचा पक्ष असतांना जेवढे मंत्री असतील, तर त्यांनी कशाला सत्ता सोडवी. काँग्रेसचे मंत्री समाधानी आहेत. पण, पक्षातील आमदार नाराज आहेत. अशीच परिस्थिती तिन्ही पक्षातील आमदारांची आहे. लवकरची ती समोर येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
के.के. रेंजप्रश्नी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, सुजित झावरे आणि मी शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी बैठका घेत आहोत. 30 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने आम्ही प्रत्येक गावात जाऊन शेतकर्यांचे मते जाणून घेतले. शेतकर्यांच्या भावना जाणून घेतल्या. यासंदर्भात दोन दिवसात भूमिका स्पष्ट करणार आहे. केंद्राची भूमिका, राज्याची भूमिका, शेतकर्यांची भूमिका यावर सविस्तर खुलासा करणार असलायचे खा. विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.