Wednesday, May 29, 2024
Homeनगरस्व. मुंडे, महाजन यांच्या मुलींच्या पाठी मोठी बहिण म्हणून मी खंबीर

स्व. मुंडे, महाजन यांच्या मुलींच्या पाठी मोठी बहिण म्हणून मी खंबीर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

स्व. गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी भाजपा वाढविली त्यांच्या मुलींचे काय हाल आहेत ते पहा. भाजपाने त्यांना न्याय द्यावा, अन्यथा मोठी बहीण म्हणून मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील ,असे प्रतिपादन खा.सुप्रिया सुळे यांनी केले.

- Advertisement -

पाथर्डी येथील संस्कारभवन येथे खा.सुप्रिया सुळे यांनी महिला व जनतेशी मुक्त संवाद साधला.यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांच्या भावनेला हात घालत पंकजा मुंडे व पुनम महाजन यांच्याबाबत भावनीक मुद्दा उपस्थित केला.

खा. सुळे म्हणाल्या, मी आज मोहटादेवीचे दर्शन घेतले. जे म्हणतात राष्ट्रवादी पक्ष आमचा आहे त्यांनी मोहटादेवी समोर यावे. मी माझे सांगते त्यांनी त्यांचे मांडावे. मात्र शपथेवर खरे बोलावे. महिलांचे संरक्षण, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव, बंद पडणार्‍या शाळा सुरू करणे, आरोग्याच्या सेवा पुरविणे, एसटी बसची सेवा दर्जेदार करणे ही कामे करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा. सेवा सन्मान व स्वाभीमान ही त्रिसुत्री अंमलात आणण्यास आमचे प्राधान्य आहे. शाळा बंद करून दारुची दुकाने सुरू करणारे हे खोके सरकार जनताच उलथवून टाकणार आहे.

नांदेडला साठ लोकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही. सध्या राजकीय दडपशाही सुरू आहे. एकीकडे खोके आणि दुसरीकडे ईडीची भीती असा डाव चालू आहे. शासन आपल्या दारीच्या नावाने जाहिराती केल्या जातात. जनतेचा पैसा वार्‍यासारखा खर्च होतोय. आम्ही आमचे सरकार आले की हे बंद करू. आता निवडणुका आल्यात त्यांच्याकडे पैसा आहे. माझ्याकडे तुमच्या सारखी जनता आहे, असे सुळे म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहीणी खडसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, संदीप वर्पे, ऋषीकेश ढाकणे, चंद्रकांत म्हस्के, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा योगीता राजळे, माजी जिल्हा परीषद सदस्या उज्वला शिरसाट, सविता भापकर, मनीषा ढाकणे, राजेंद्र हिंगे, रामराव चव्हाण, राजेंद्र खेडकर, देवा पवार, राहुल गवळी, भारती असलकर, बंडूपाटील बोरुडे, भगवान दराडे, नवनाथ चव्हाण, भाऊसाहेब धस आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर राजळे यांनी केले तर योगेश रासने यांनी आभार मानले.

भाजप तुमचा कसा होईल ?

भारतीय जनता पक्ष ज्यांनी चाळीस वर्षे खस्ता खावून वाढवीला त्या एकनाथ खडसेंना पक्षाने किती त्रास दिला. आम्ही तो भोगला आहे व बाहेरही पडलो. गोपिनाथराव मुंडे यांनी पक्ष तळागाळात नेला त्यांच्या मुलीला पंकजाताई मुंडे यांना किती त्रास दिला जातोय. सहन होत नाही. ज्यांनी चाळीस वर्षे कष्ट घेतले त्यांचा भाजपा झाला नाही तर तुमचा तो कसा होईल? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रमुख खासदार रोहणी खडसे यांनी यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या