मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, हिमालय घोरपडे हे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. रवींद्र भाबड हे तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच नागपूरची प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच पात्रता गुण जाहीर करण्यात आले आहेत.
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पात्रतागुण जाहीर केले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या १,५१६ उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया ३० ऑक्टोबरपर्यंत पार पडली. एकूण ७,९७० उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ७,७३२ उमेदवारांनीच मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केला. विविध तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अडचणी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने अर्जप्रणाली खुली ठेवत उर्वरित पात्र उमेदवारांना संधी दिली होती. त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला.
राज्यात प्रथम क्रमांक पटकावणारे विजय लमकणे हे यापूर्वीही एमपीएससीमार्फत विविध सेवांसाठी निवड झालेले अधिकारी असून, सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. या निकालात पुण्याचे समर्थ बालगुडे हे ४२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांसह विविध न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या न्यायिक प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
कटऑफमुळे निकाल चर्चेत
यंदाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट-ऑफ इतिहासातील सर्वाधिक राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. या परीक्षेत सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी कट-ऑफ 507.50 गुणांवर, अनुसूचित जातीसाठी 447 गुणांवर, तर अनुसूचित जमातीसाठी 415 गुणांवर गेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या उच्च कट-ऑफमुळे आश्चर्य व्यक्त करत “स्पर्धा अधिक तीव्र झाली” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




