Wednesday, November 4, 2026
HomeराजकीयMPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी CM फडणवीसांकडे राजीनामा दिलाय, रोहित पवारांचा मोठा...

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी CM फडणवीसांकडे राजीनामा दिलाय, रोहित पवारांचा मोठा दावा

पुणे । Pune

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीवरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय वळण मिळाले आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या राजीनाम्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय न झाल्यास पुणे बंदचे आंदोलन उभारण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून MPSC विद्यार्थी विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करत आहेत. रोहित पवार हेही विद्यार्थ्यांसोबत आंदोलनस्थळी सहभागी झाले आहेत. मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारने विवेक भीमनवार यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा, अशी मागणी केली. रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, भीमनवार यांनी काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. मात्र, राजीनामा देण्याची प्रक्रिया आणि तो कोणाकडे सादर करणे अपेक्षित आहे, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. भीमनवार यांनी राजीनाम्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे सोपवून निर्णयाचा चेंडू सरकारच्या कोर्टात टाकल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.

“विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायच्या की नाही, याचा निर्णय सरकारने घ्यावा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजीनाम्याबाबत निर्णय झाला नाही तर ठरल्याप्रमाणे पुणे बंद करू,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला. तसेच सरकारसमोर आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देण्याचा मुद्दा असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पुण्यातील MPSC आंदोलनाबाबत पोलिसांनीही कारवाईची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. आंदोलनांना परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही आंदोलन सुरू असल्याने काही विद्यार्थी आणि खासगी शिकवणी, अभ्यासिका चालकांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आंदोलनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका ठेवत २९ खासगी शिकवणी व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा दिल्याची माहिती आहे.

या कारवाईवरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांना नोटिसा देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत त्यांनी पुणे पोलिसांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. “परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी,” असे ते म्हणाले. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय होतो, तसेच MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे पुण्यासह राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूकीत विखे-थोरात-गडाखांचा ‘सहकार विकास’ सुसाट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू असणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख...