Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूज…तर न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम

…तर न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम

पुणे | Pune
एमपीएससी परीक्षेवरून पुन्हा एकदा विद्यार्थांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडणीला सामोरे जावे लागत आहे. आयोगाची बुधवारी बैठक होणार होती, पण ती गुरुवारी होणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनीही लाक्षणिक उपोषण केले. रोहित पवार यांच्यानंतर आता थेट शरद पवार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरणार आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर आता शरद पवारांनी स्वतः दखल घेत सरकारला लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत इशारा दिला आहे.

शरद पवार यांनी एक्स वर पोस्ट करत आता सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी दिलाय.

एमपीएससी आणि आयबीपीएस या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येत आहेत. त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करत आहे. या दोन्ही मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत असून चार दिवसांवर परीक्षा असताना अभ्यास सोडून विद्यार्थी पावसात आंदोलनाला बसले आहेत. आयोग वेळकाढूपणा का करत आहे असा प्रश्न आंदोलक विद्यार्थी विचारत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या