Thursday, April 23, 2026
HomeनगरACB Trap : महावितरणचे सहायक अभियंता व वायरमन लाचलुचपतच्या जाळ्यात

ACB Trap : महावितरणचे सहायक अभियंता व वायरमन लाचलुचपतच्या जाळ्यात

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

विज चोरीची कारवाई व मोठा दंड टाळण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल 1 लाख 25 हजार रूपयांची लाच मागणार्‍या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) सहायक अभियंता व वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई नेवासा फाटा परिसरात करण्यात आली असून, त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

म.रा.वि.वि. मर्या. उपविभाग नेवासा येथील सहायक अभियंता किरण गजेंद्र मोरे (वय 34), आणि प्रधान तंत्रज्ञ (वायरमन) शिवकुमार नारायण आचारी (वय 47) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर अ‍ॅक्वा प्लॅन्ट आहे. त्यासाठी कमर्शिअल व घरगुती वापरासाठी स्वतंत्र वीज मीटर लावण्यात आलेले आहेत.

22 डिसेंबर 2025 रोजी सहायक अभियंता मोरे व वायरमन आचारी यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन मीटर तपासणी केली व तुम्ही विज चोरी करता, तुमच्यावर कारवाई करून सुमारे चार लाख रूपयांचा दंड होईल, असे सांगितले. तसेच थकीत 36 हजार रूपयांचे बिल भरण्याची मागणी केली. यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी दोघे पुन्हा तक्रारदाराच्या घरी गेले व चार लाख दंड टाळायचा असेल तर दोन लाख रूपये द्या, नाहीतर विज चोरीची कारवाई करू, अशी थेट लाचेची मागणी केली.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2025 रोजी नेवासा फाटा येथील पावन गणपती मंदिरासमोर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्या वेळी सहायक अभियंता मोरे याने विज चोरीची कारवाई न करण्यासाठी 1 लाख 25 हजार रूपयांची लाच मागितल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले.

1 जानेवारी 2026 रोजी नेवासा फाटा येथील देवरे हॉस्पिटलजवळ सापळा रचण्यात आला. सहायक अभियंता मोरे याच्या सांगण्यावरून वायरमन शिवकुमार आचारी याने लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून 50 हजार रूपये पंचासमक्ष स्वीकारले, त्या क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Kopargaon : पश्चिमेचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याबाबत चालढकल थांबवा

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळवण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता आता न्यायालयाच्या रडारवर आली आहे....