Tuesday, September 17, 2024
Homeनगरबहिणींचा अर्ज भरण्यासाठी कलेक्टर, सीईओ मैदानात

बहिणींचा अर्ज भरण्यासाठी कलेक्टर, सीईओ मैदानात

तांंत्रिक अडचणीमुळे महिला त्रस्त || दोन दिवसात जिल्हाभरात 1 हजार 390 विशेष शिबिर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सर्व्हर डाऊन, अ‍ॅप ओपन होईना, कागदपत्रे अपलोड करण्यास लागणार वेळ अशा एक ना अनेक तांत्रिक समस्यांनी लाडक्या बहिणी व अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत. दुसरीकडे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालय, तहसील कार्यालयासमोर महिलांची गर्दी होतांना दिसत आहे. दरम्यान, शनिवारी योजनेची सुरू असलेली अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी यांनी जिल्ह्यात आयोजित विशेष शिबिराच्या ठिकाणी भेट देत याठिकाणी महिलांचे ऑनलाईन अर्ज स्वत:च्या मोबाईलवरून भरले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना फायदा हवा, यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने प्रत्येक गावात शिबिराचे आयोजन केले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात दोन दिवस या योजनेसाठी 1 हजार 390 ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी योजनेचा अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच महिलांनी ठिकाणी गर्दी केली होती. हातावर पोट असणार्‍या महिला रोजगार बुडवून अर्ज भरण्यासाठी थांबले होत्या. मात्र, यावेळी नारी शक्ती अ‍ॅप ओपन झाले, तरी अर्ज भरतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मुलीचे लग्न झाले पण तिचे नाव माहेरच्याच शिधापत्रिकेत आहे. यासाठी योजनेसाठी आवश्यक उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बँकेचे खाते यांची माहितीसह कागदपत्रे जमा करण्यात महिला व्यस्त दिसत आहे.

या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे महिलांनी गडबड करू नये. जिल्ह्यात सर्वत्र शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे सर्वत्र ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम सुरू असल्याने अ‍ॅप सावकाश चालत आहे, असे अनेक ठिकाणी अधिकारी सांगतांना दिसत होते. नगरजवळील केडगाव देवी परिसरात जिल्हाधिकारी सालिमठ यांनी थेट महिलांशी संवाद साधत योजनेची माहिती दिली. तसेच स्वत:च्या मोबाईलवर ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी थेट मोबाईलवरच महिलेचा फोटो काढत साईटवर अपलोड केला. जिल्हाधिकारी यांचे साधेपणा पाहून महिला भारवल्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी देखील काही महिलांचे स्वत:च्या मोबाईलवर ऑनलाईन अर्ज भरले.

राहुरीच्या अंगणवाडी सेविकांचे कौतुक
जिल्हाधिकारी सालिमठ यांनी राहुरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या कामाचे कौतूक केले आहे. याठिकाणी कार्यरत असणार्‍या अंगणवाडी सेविका पहाटे पाच वाजता योजनेच्या ऑफलाईन संकलीत केलेल्या अर्ज ऑनलाईन करण्यास सुरूवात करत आहेत. तसेच पहाटे पाच वाजता संबंधीत महिलांना फोन करून त्यांच्याकडून अ‍ॅपवर माहिती भरून येणारा ओटीपी घेवून संबंधीत महिलांचे ऑनलाईन अर्ज भरत आहेत. राहुरी तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेने दोन दिवसात पहटे अशा प्रकारे 135 ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे. या कामाचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी कौतुक केले आहे.

दोनपेक्षा अधिक बहिणींना लाभ
माझी लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ दिला जाणार होता. मात्र, या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यानुसार कुटुंबाची व्याख्या स्पष्ट केली असून त्यानुसार कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले किंवा मुली असे ग्राह्य धरले जाणार आहे. यामुळे एकाच घरातील आता दोनपेक्षा जादा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या