अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजारांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यासह वृध्दावस्थेमुळे ज्यांना ऐकण्यात, दिसण्यास आणि चालण्यास अडचण येते अशा वृध्दांना चष्मा, श्रवणयंत्रासह अनेक आवश्यक उपकरणे देण्यात येणार आहे. राज्य सरकारने यंदाच्या बजेटमध्ये 480 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. नगर जिल्ह्यातून आतापर्यंत या योजनेत 60 हजार लाभार्थी यांची नोंदणी करण्यात आली असून यापैकी 58 हजार लाभार्थ्यांची माहिती सरकारच्या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे. अशी माहिती सादर करणारा नगर जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्याने दिसण्यास त्रास होतो, ऐकणे आणि चालण्यात समस्या येतात. पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणे खरेदी करता येत नाहीत, अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणार्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदी व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. योजनेत पात्र असणार्या नागरिकांना 3 हजार रूपये रोख आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसेच गरज असणार्यांना चष्मा, ट्रायपॉड, कमरे संबंधीचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र आदी यंत्रणे देण्यात येणार आहेत.
नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबवल्यानंतर आता जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री वयोश्री योजनेवर लक्ष केंद्रीत केले आहे. योजनेत ग्रामीण भागातील जास्ती जास्त ज्येष्ठांना सहभाग घेता यावा, यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी शिबिराचे आयोजन करून पात्र लाभार्थी यांचे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे भरून घेण्यात आली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी ही योजना यशस्वी करण्यासाठी गाव पातळीसह तालुक्यापर्यंत वेेगवेगळ्या ठिकाणी भेटी देवून योजनेत जास्ती जास्त लाभार्थी यांची निवड करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
यामुळे नगर जिल्ह्यातून राज्यात सर्वाधिक पात्र लाभार्थी यांची माहिती शासनाला सादर करता आली आहे. जिल्ह्यातील 60 हजार लाभार्थी सरकारकडे सादर करण्यात आली आहे. यातील 58 हजार लाभार्थी यांची माहिती सरकारी ऑनलाईनपोर्टलवर सादर करण्यात आली आहे. राज्यभरातून सरकारकडे आतापर्यंत 5 लाख 29 हजार 979 ज्येष्ठांची माहिती सादर झालेली असून त्यात नगरचा सर्वाधिक वाटा आहे. नगर खालोखाल कोल्हापूर जिल्ह्याचा नंबर असून त्याठिकाणी 58 हजार 292 ज्येष्ठांची माहिती संकलित झालेली आहे. वाशिम जिल्ह्यातून 32 हजार 11 लोकांची माहिती संकलित झाली आहे. यातील अवघी 3 हजार 774 माहिती, गडचिरोली जिल्ह्यातून 25 हजार 213 लाभार्थी यांची माहिती संकलित झाली असून यापैकी 21 हजार 754 लाभार्थी यांची माहिती ऑनलाईन झाली आहे. या योजनेचे सनियंत्रण समाज कल्याण उपायुक्त राधाकिसन देवढे करत आहेत. यासह जिल्हा परिषदेची टीम योजनेसाठी प्रयत्न करत आहे
‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी कॅम्प घेवून पात्र लाभार्थी यांना योजनेत सहभागी करून घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. राज्यात सर्वात मोठे काम नगर जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अजून मोठ्या संख्याने लाभार्थी योजनेत सहभागी करण्यास संधी आहे.
– आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.