देवगड फाटा |वार्ताहर|Devgad Phata
मुळाचे आवर्तन लांबल्याने नेवासा तालुक्यातील टेलच्या भागातील खडका, जळके बुद्रुक, बाभुळखेडा, जळके खुर्द, देवगड फाटा, माळेवाडी या टेलच्या भागातील शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. परिसरातील पिके करपली जात आहे. मुळाच्या पहिल्या रब्बीच्या आवर्तनाबाबत आजपर्यत नियोजन झाले नाही. मुळाचे पहिले आवर्तन राजकीय आखाड्यात अडकल्याने रब्बी पिकांना उशिरा मिळणारे पाणी वरातीमागून घोडे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दि. 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचाही शपथविधीही पार पडला. आता मंत्रीमंडळ विस्तार ही झाला. तरी मुळा उजव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्यात आलेले नाही. शेतकर्यांनी परिसरात कांदा, हरबरा, गहू, मोहरी, भाजीपाला आदी रब्बी पिके लागवड केली आहे. या भागातील विहिर, बोअरची पाणी पातळी खालावली गेल्याने उभ्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकर्यांची घडपड सुरु आहे. जर आवर्तनाला उशिर झाला तर शेतकर्यांना मोठ्या नुकसानीला सामोर जाण्याची भिती निर्माण झाली आहे. सध्या नेवासा तालुक्यातील टेलच्या भागातील खडका, जळके बुद्रुक, बाभुळखेडा, जळके खुर्द, देवगड फाटा या टेलच्या परिसरातील शेतकर्यांचे विहीरी, बोअरवेल कोरडेठाक पडले आहे. कारण परतीच्या पावसाने यंदा लवकरच परतीची वाट धरल्याने पर्जन्यमान माफकच राहीले आहे. त्यामुळे कमी दिवसात पातळी खालावली आहे. सध्या रब्बी पिकांना पाण्याची नितांत गरज भासू लागली आहे.
मुळा कालव्यातून पाण्याचे नियोजनाचा घोळ आणखी किती दिवस चालणार? मग शेतकर्यांच्या पिकांना पाणी कधी मिळणार? या प्रश्नानेच शेतकरी हैराण झाले आहे. शेती पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. मुळा धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे यंदा शेतीला पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. शेतीसाठी सोडलेले आवर्तन हे टेलच्या शेतकर्यांना कायमच पंधरा ते विस दिवसानंतर मिळत. आणि आता जर मुळाच्या पहिल्या आवर्तनाला उशीर झाला तर मिळणारे पाणी वरातीमागून घोडे ठरणार हे मात्र नक्की! शेतीपिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी संबधीत प्रशासनाला अधिकार देऊन आवर्तनाचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मुळा कालव्याच्या खडका पाणी वितरिकेवर 1800 हेक्टर शेतीचे इरिगेशन होते. यात खडका, जळके खुर्द, जळके बुद्रुक, बकुपिंपळगाव, मुरमे, मडकी, प्रवरा संगम, माळेवाडी, बाभुळखेडा, देवगड फाटा व पिचडगाव चा काही भाग आदी गावांना या वितरीकेद्वारे पाटपाणी मिळते, रब्बी हंगामात शेतकर्यांनी विहीर, बोअर च्या पाण्यावर पिकांची लागवड केली. मात्र, डिसेंबर महिन्यात विहीर व बोअर ने तळ गाठल्याने परिसरातील शेती आता पटपाण्यावर आहे. या आठवड्यात आवर्तन सुटले नाही, तर शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
मुळा धरण पुर्णक्षमतेने भरलेले असताना तसेच शेतकर्यांची पाणी सोडण्याची मागणी असताना देखील मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुटत नाही. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पहिल्या आवर्तनाचे नियोजन करावे.
– नितीन दहातोंडे शेतकरी, जळके