Wednesday, July 3, 2024
Homeनगरमुळा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी तहसील कार्यालयात शेतकर्‍यांचा ठिय्या

मुळा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी तहसील कार्यालयात शेतकर्‍यांचा ठिय्या

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने तालुक्यातील शेतीसाठी व पशुधन वाचविण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी आ. प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त लाभधारक शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात सुमारे तासभर ठिय्या मांडला. अधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा होऊन उद्यापर्यंत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले.

काल सकाळी अकरा वाजता राहुरी तहसील कार्यालयात आ.तनपुरे यांनी लाभधारक शेतकर्‍यांसह ठिय्या मांडला. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील, मुळा डावा कालवा अभियंता अच्चुत गिते, तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी आ. प्राजक्त तनपुरेंसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही असा पावित्रा लाभधारक शेतकर्‍यांनी घेतला होता. अखेर जिल्हाधिकार्‍यांशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करत आज सायंकाळी तात्काळ बैठक आयोजित करून यामध्ये सकारात्मक योग्य ते निर्णय घेऊ, असे आश्वासन भ्रमणध्वनीद्वारे जिल्हाधिकार्‍यांनी आ. तनपुरे यांना दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत.

मात्र सायंकाळपर्यंत योग्य निर्णय झाला नाही तर उद्या नगर-मनमाड महामार्गावर शेतकरी व जनावरांसह रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा आ.तनपुरे यांनी दिला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, अमृत धुमाळ, दिलीप इंगळे, सुरेश करपे, किशोर महाराज जाधव, रवींद्र आढाव, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब खुळे, ज्ञानेश्वर खुळे, उमेश खिलारी, पंढरिनाथ पवार, शिवाजी थोरात, बाळासाहेब गाडे, आदिनाथ तनपुरे, प्रभाकर गाडे, सुनिल मोरे, बाळासाहेब गाडे, नवनाथ थोरात, भाऊसाहेब आढाव, संजय पोटे, शहाजी ठाकुर, दत्तात्रय कवाने, नवाब देशमुख, अ‍ॅड रावसाहेब करपे, सतीश आढाव, अनिल पोटे, आनंद वने, विश्वास पवार, अक्षय वने, धनंजय सप्रे आदींसह लाभधारक शेतकरी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

आ.तनपुरेंचा जिल्हाधिकार्‍यांना फोन
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांंनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नियोजन करून योग्य तो निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आ. प्राजक्त तनपुरे यांनी आता आवर्तन सोडणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार निर्णयही झाला होता. मात्र अचानक सदर निर्णय रद्द झाल्याने आमदार तनपुरे यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांना फोन केला आणि संतप्त लोकभावना लक्षात घेता आवर्तन सोडणे गरजेचे आहे. हे निर्दशनास आणून दिले. जिल्हाधिकार्‍यांनी देखील तात्काळ बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे तनपुरेंना सांगितले.

स्वाभिमानीने अधिकार्‍यांना कोंडून घेण्याचा केला प्रयत्न
तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू असताना जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत अधिकार्‍यांना बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह शेतकर्‍यांनी घेतला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार्‍यांना कार्यालयात दरवाजा बंद करून कुलूप लावून कोंडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. तनपुरे यांनी विनंती केल्यानंतर मोरे यांनी दरवाजा उघडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या