सोनई |वार्ताहर| Sonai
चालू वर्षी मुळा धरण भरले नाही. लाभक्षेत्रातही पुरेसा पाऊस झालेला नाही. विहिरी व बोरच्या पाण्याची पातळी खालावली आहे. तर अशा अवस्थेत जिल्ह्यातल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांची वस्तुस्थिती माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकार्यांनी मुळा धरणातून 2.10 टीएमसी पाणी सोडण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय शेतकर्यांच्या मुळावर आला असून तो अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.
मुळा कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख भाषणात ते म्हणाले, समन्यायी कायद्यानुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेताना काही मध्यम मार्ग काढला पाहिजे व तो निघत नसेल तर मुळा व भंडारदारा धरणातून पाणी सोडण्याऐवजी कालव्यांची कामे अपूर्ण असलेले निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी जाहीर मागणी आपण यापुर्वी केली होती. मात्र शासनाला चुकीची माहिती देऊन मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या अधिकार्यांनी चुकीचा व एकतर्फी घेतलेला निर्णय शेतकर्यांवर अन्यायकारक असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. मुळा व प्रवरा खोर्यातील पाणी सोडण्याबाबत आपल्यात वाद करत बसण्याऐवजी निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. हे धरण 100 टक्के भरलेले आहे.
उजव्या तट कालव्यांची अपूर्ण कामे करण्यासाठी धरण भिंतीजवळ रिकामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामासाठी धरण नंतर रिकामे करण्याऐवजी आजच पाणी सोडले तर मुळा धरण 85 टक्के भरलेले असताना या धरणातून पाणी सोडण्याची गरज पडणार नाही व त्यामुळे शेतकर्यांचे पाण्याअभावी होणारे नुकसान टळेल. मुळा, प्रवरा खोरे असा वाद आपल्यात करून यात मराठवाडा आपले पाणी नेण्यास यशस्वी होते.ते आपल्याला होऊ द्यायचे नाही. या विषयावर मी उद्या सविस्तर बोलणार असल्याचे सांगून या अन्यायकारक निर्णयाविरोधात गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी घोडेगाव येथे नगर औरंगाबाद राजमार्गावर आयोजीत केलेल्या रास्तारोको आंदोलनास सर्व लाभधारक शेतकर्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
गळीत हंगामाबाबत बोलताना आमदार गडाख म्हणाले, गेली 4 वर्षे धरण भरले असल्याने व पाऊस पाणी चांगले होत असल्याने 15 ते 16 लाख टन उसाचे उत्पादन वाढले होते. गाळप क्षमता अपुरी पडत असल्याने शेतकर्यांच्या उसाचे नुकसान व्हायचे, ते टाळण्यासाठी 160 दिवसांत 15 लाख टन ऊस गाळप करता येईल यादृष्टीने गाळप क्षमता वाढवली. इथेनॉल प्रकल्प उभारून जुन्या डिस्टीलरीची क्षमता वाढवली. हंगामात 4 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन क्षमता उभारली. यासाठी जवळपास 170 कोटी खर्चाचा निर्णय मोठ्या धाडसाने घेतला. त्यासाठी अडचणीच्या काळात उपयोगी पडेल यासाठी राखून ठेवलेला ऊस दर चढ उतार निधी उपयोगात आणला. मात्र मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि चालू वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागणार असला तरी यापुढच्या काळात कार्यक्षेत्रात कितीही मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन झाले तरी त्याचे वेळेत गाळप करण्यास अडचण राहणार नाही. शेतकर्यांचे नुकसान होणार नाही.
आमदार गडाख म्हणाले, आज जिल्ह्यात उसाची तीव्र टंचाई असताना देखील नेवासा तालुक्यात गाळपासाठी सर्वाधिक ऊस आहे. म्हणून कार्यक्षेत्र आणि कॉमन झोनमधील शेतकर्यांनी त्यांचा जास्तीत जास्त ऊस मुळा कारखान्यास गळितास देऊन हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी, बाळासाहेब पाटील व बाबासाहेब भणगे यांनी गव्हाणीची सपत्नीक पूजा केली. आमदार शंकरराव गडाख यांच्याहस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी मुकादम व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.