Saturday, May 4, 2024
Homeनगरमुळाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा फायदा पाथर्डीतील दुष्काळी भागाला झाला पाहिजे

मुळाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा फायदा पाथर्डीतील दुष्काळी भागाला झाला पाहिजे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरीसह दक्षिण नगर जिल्ह्याची तहान भागविणारे मुळा धरण पूर्ण भरले आहे. धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी नदीतून तसेच दोन्ही कालव्यातून सोडले जात असताना या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा फायदा पाथर्डीच्या दुष्काळी भागातील गावांना झाला पाहिजे. या हेतूने वांबोरी चारीच्या माध्यमातून ओव्हरफ्लोचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी माहिती राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघाचे आमदार माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

याबाबत विस्तृत विवेचन करताना मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरणार हे टप्प्यात दिसत असतानाच जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना देऊन वांबोरी चारीच्या बाबतीत अनेक देखभाल दुरुस्ती व इतर कामे वेळीच करून घेतल्याने शनिवारपासून वांबोरी चारीद्वारे मुळा धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागापर्यंत पोहोचण्यासाठी वांबोरी चारी सुरू करण्यात आली आहे. कालपर्यंत गुंजाळेपर्यंत पाणी गेल्यानंतर पाईप लिकेज व इतर बाबी निदर्शनास आल्या आहेत.

त्यातून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून उद्यापासून पुन्हा वांबोरी चारी पूर्ववत सुरू राहील. वांबोरी चारी सुरू झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील खोसपुरी या शेवटच्या भागापर्यंत तलाव सुरुवातीला भरून त्यानंतर मिरी, करंजी आदी भागातील तलाव भरले जातील. गेल्या तीन पावसाळ्यात वांबोरी चारीतून टेलच्या भागापर्यंत जास्तीत जास्त पाणी आपण पोहोचू शकलो व यासाठी निसर्गानेही भरभरून साथ दिली, याचे समाधान प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

वांबोरी चारी वेळोवेळी देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच वीजबिलासाठी भरीव निधीची तरतूद वेळोवेळी आपण केली व त्याच नियोजनातून आपण पाथर्डीसह आपल्या मतदारसंघातील दुष्काळी असणार्‍या गावांना जास्तीत जास्त पाणी देऊ शकलो, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शेतकर्‍यांनीही सर्वांना पाणी मिळेल, यासाठी कोणती घाई गडबड न करता टेल टू हेड याप्रमाणे पाणी मिळेल, असे आश्वासित केले. ओव्हरफ्लोच्या पाण्याच्या व्यतिरिक्त वांबोरी चारीच्या असलेल्या 680 एमसीएफटी हक्काचे पाणी वेळोवेळी चारीतून शेतकर्‍यांना मिळेलच असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे पाथर्डी उपजिल्हाप्रमुख रफिक शेख तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे उपस्थित होते.

मतदारसंघाची जबाबदारी मतदारांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर सोपविल्यानंतर एक पाय गुण म्हणा, तीनही वर्ष धरण पूर्ण क्षमतेने भरभरून वाहिले.

– शशिकांत गाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख.

- Advertisment -

ताज्या बातम्या