Sunday, September 8, 2024
Homeनगरमुळा निम्मे भरले; गोदावरीत 14237 क्युसेकने पाणी

मुळा निम्मे भरले; गोदावरीत 14237 क्युसेकने पाणी

कुकडी प्रकल्पात 40 टक्के पाणी, डिंभे 57 टक्के

कोतूळ |वार्ताहर| Kotul

मुळा नदी पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. कालही या परिसरात पावसाची संततधार सुरूच होती. यामुळे यावर्षीची 29 हजार 533 क्युसेसची सर्वाधिक पूर पातळी काल गुरुवारी मुळा नदीने ओलांडली. नदीच्या पूर पातळीमुळे मुळा धरणाकडे मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता 12,980 दशलक्ष घनफूट पार गेला असून रात्री या धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेला.

- Advertisement -

धरणाकडे सकाळी सहा वाजता कोतूळ येथून 29 हजार 533 क्युसेस विक्रमी आवक सुरू होती व सकाळी नऊ वाजता 20,828 क्युसेस आवक सुरू होती. तर सायंकाळी सहा वाजता आवक कमी होऊन ती 9,541 वर आली. रात्री 11 वाजता विसर्ग 11152 दलघफू झाला आहे. जोरदार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. संततदार पावसाने परिसरातील जनजीवन गाठून गेले आहे. आदिवासी भागात उर्वरित भात लावण्या अंतिम टप्प्यात आहे. ओढे नाले ओसंडून वाहत आहे निसर्ग ओलाचिंब झाला आहे. ओढे नाले सक्रिय झाल्याने परिसरातील सौंदर्य मिळण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे भर पावसात पावसाचा आनंद घेण्यासाठी फोफसंडी व हरिश्चंद्रगड परिसर पर्यटकांना खुणावत आहे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी घाट माथ्यावर पर्यटक रेंगाळताना दिसत आहेत.

गोदावरीत 14237 क्युसेकने पाणी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

घाटमाथ्यावरील पावसाने दारणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने दारणातून काल सायंकाळी 11946 क्युसेकने विसर्ग सुरू होता. गंगापूर धरण निम्मे भरले! भावली पाठोपाठ कडवा फुल्ल भरले, भावलीतून 822 क्युसेक तर कडवातून 800 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून सायंकाळी 11079 क्युसेकने तर रात्री 10 वाजता 14237 क्युसेकने विसर्ग गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झालेल्या धुव्वाधार पावसाने दारणा समुहातील धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक होत आहे. काल गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. काल सकाळी दारणात पाऊण टीएमसी (868 दलघफू) नवीन पाणी 24 तासांत दाखल झाले. या धरणात 81 टक्के पाणी साठा राखुन नवीन येणार्‍या पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने दारणातून टप्या टप्याने विसर्ग वाढवत तो 11946 क्युसेक वर नेण्यात आला. दारणाच्या विद्युत प्रकल्पाच्या दरवाज्यातून 1100 क्युसेकने तर वक्राकार दरवाज्यातून उर्वरित पाणी सोडले जात आहे. या साठी दारणाचे पाच गेट दोन फुटांनी उचलण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाने पाणी दारणा नदीतून गोदावरीवरील नांदूरमधमेश्वर बंधार्‍याकडे धावत आहे. भावली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यांच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. काल या धरणाच्या सांडव्यावरुन 822 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने सुरु होता. दारणा समुहातील कडवा धरणातही संततधार पावसामुळे पाणी साठ्यात जलद वाढ होत आहे. धरण पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल दुपारी 1.30 वाजता या धरणातुन सुरुवातीला 200 क्युसेकने, सायंकाळी 6 वाजता 400 क्युसेक ने नंतर रात्री 8 वाजता 800 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात येत होता. या धरणाचे पाणी दारणा धरणाच्या खाली दारणाच्या पाण्यात मिसळत असुन ते ही नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने वाहत आहे.

दारणाच्या पाणलोटातील इगतपूरी येथे 24 तासांत 217 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 143 मिमी, भावलीला 170 मिमी, दारणा च्या भिंतीजवळ 36 मिमी, मुकणे 81 मिमी, वाकी 95 मिमी, भाम 70 मिमी, वालदेवी 48 मिमी असा पाऊस नोंदला गेला. दारणा धरणात 81.37 टक्के, मुकणे 27.48 टक्के, वाकी 32.30 टक्के, भाम 92.61 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 46.87 टक्के असे साठे आहेत. गंगापूर धरण काल सकाळी निम्मे भरले. गंगापूर च्या पाणलोटातील अंबोली येथे 113 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबक येथे 89 मिमी, गंगापूर च्या भिंतीजवळ 61 मिमी, कश्यपी 74 मिमी, गौतमी गोदावरी 66 मिमी, कडवा 43 मिमी, आळंदी 46 मिमी असा पाऊस नोंदला गेला. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 2812 दलघफु पाणीसाठा झाला आहे. काल सकाळी मागील 24 तासात गंगापूर मध्ये 422 दलघफू नविन पाणी दाखल झाले. कश्यपी 23.54 टक्के, गौतमी गोदावरी 49.30 टक्के, कडवा 81.58 टक्के, आळंदी 11.89 टक्के असे साठे आहेत.

दारणा, कडवातील तसेच नाशिक परिसरातील, निफाड भागातील पाणी गोदावरीवरील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍याचे 4 वक्राकार गेट 1 मिटर ने उचलण्यात आले आहे. काल सकाळी 6 वाजता या बंधार्‍यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 2421 क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात येत होते. वरील धरणांचे पाणी दाखल झाल्यानंतर गोदावरीत 4 वाजता 8804 क्युसेक, सायंकाळी 5 वाजता 11079 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. यात रात्रीतून काहिशी वाढ होवु शकते. या विसर्गामुळे गोदावरी दुथडी भरुन जायकवाडीच्या दिशेन वाहत आहे.

कुकडी प्रकल्पात 40 टक्के पाणी, डिंभे 57 टक्के

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 49 हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देणारे डिंभे धरण 57 टक्के भरल्याने लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. कुकडी प्रकल्पातील सर्वाधिक क्षमतेचे हे धरण आहे. कुकडी प्रकल्प धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस होत असल्याने या समुहात गत 24 तासांत तब्बबल 3256 दलघफू पाण्याची आवक झाली. या हंगामातील हा विक्रम आहे. काल सकाळी उपयुक्त पाणीसाठा 10319.22 दलघफू (34.77 टक्के) झाला होता.

पाण्याची आवक सुरूच असल्याने काल गुरूवारी सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर पोहचला होता. वासी भागातील आहुपे, पाटण व भीमाशंकर खोर्‍यात चार दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने डिंभे धरणात जोमाने पाणी जमा होत आहे. वडजमध्ये पाण्याची आवक जोरदार आवक होत असल्याने वडज सांडवा आधी 2000 क्युसेकने सुरू करण्यात आला होता. पण पाणी वाढतच असल्याने काल सकाळी तो 4000 क्युसेक करणण्यात आला. मीना पूरक कालव्यालाही पाणी सोडण्यात आले आहे. पंधरा आठ दिवसांपूर्वी कुकडी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा होता. पण गत आठ दिवसांपासून पाऊस होत असल्याने या प्रकल्पातील विविध धरणांत नवीन पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठा वाढत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या