Tuesday, January 6, 2026
HomeनगरRahuri : मुळा धरण 68 टक्के भरले; गोदावरीत विसर्ग सुरू

Rahuri : मुळा धरण 68 टक्के भरले; गोदावरीत विसर्ग सुरू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळाधरणात काल सायंकाळी पाणीसाठा 17 हजार 714 दलघफू झाला आहे. धरण जवळपास 68.13 टक्के भरले असून आवक वाढली तर आज बुधवार दि. 9 जुलै रोजी धरणातून मुळानदी पात्रात जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्याची शक्यता मुळा पाटबंधारे विभागाच्या सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
मुळा धरणातून नदीपात्रात पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात धरणातून पाणी सोडण्याचा हा पहिलाच प्रसंग असणार आहे. यावर्षी मुळा धरणासह सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आह. काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहे.

- Advertisement -

या हंगामात मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात अर्धा दलघफू नव्याने पाणी जमा झाले. जूनमध्ये सव्वा तीन दलघफू पाणी जमा झाल्याने दहा फुटांनी पाणी पातळी वाढली. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच धरणात तब्बल साडेचार दलघफू पाण्याची आवक झाली. या वर्षात काल पर्यंत एकूण 8 हजार 28 दलघफू नविन पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा काल मंगळवार दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 17 हजार 714 (68.13 टक्के) दलघफूवर पोहोचला.

YouTube video player

काल सकाळच्या तुलनेत आवक कमी होऊन ती 4 हजार 429 वर आली आहे. जलाशय परिचरण सूची नुसार 1 ते 15 जुलै पर्यंत 18 हजार 161 (69.85 टक्के) पाणीसाठा ठेवणे बंधनकारक असल्याने अतिरिक्त पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जर आज आवक वाढून धरणात जलाशय परिचरण सूची नुसार पाणीसाठा झाला तर धरणातून आज मुळानदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे.

गोदावरीत 35918 क्यूसेकने विसर्ग सुरू

जायकवाडीत उपयुक्त साठा आज 65 टक्क्यांच्या पुढे सरकणार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणा गंगापूर धरणांच्या पाणलोटात काल पावसाचा जोर ओसरला होता. अधून-मधून बुरबुर स्वरूपाचा पाऊस पडत होता. घाटमाथ्यावरील पाणी नव्याने दाखल होत असल्याने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. खाली गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 35 हजार 918 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा 60.71 टक्के इतका झाला आहे. उद्या गुरुवारी दिवसभरात जायकवाडी 65 टक्क्यांच्या पुढे सरकेल. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्यातून नगर, नाशिक जिल्ह्यांना यंदा पुन्हा दिलासा मिळणार आहे.

काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात दारणा धरणात 1 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे. काल सकाळी 9 वाजता दारणा धरणातून 10814 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. तो दुपारी 3 वाजता घटवून 8348 क्यूसेकवर आणण्यात आला. काल सकाळी सहा पर्यंत 1 जूनपासून 7.1 टीएमसी क्षमतेच्या दारणा धरणातून 7.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या धरणात 67 टक्के पाणी साठा आहे. दारणा समूहातील भावलीतून 701 क्यूसेक, वाकीतून 363 क्यूसेक आणि भाम मधून 1794 क्यूसेकने विसर्ग दारणा धरणाच्या दिशेने सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला आहे. 24 तासात गंगापूर धरणात 300 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली.

पाऊस कमी झाल्याने गंगापूर धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग 6336 क्युसेकवरून 3969 क्यूसेकवर आणण्यात आला आहे. या धरणातून 1 जूनपासून 4.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 5.6 टीएमसी क्षमतेच्या या धरणात 57.58 टक्के पाणी साठा आहे. गंगापूर समूहातील कश्यपी धरणातून 1000 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. पालखेड धरणातूनही 1356 क्युसेक, पुणेगावमधून 450 क्यूसेक, भोजापूरमधून 810 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. करंजवन 945 क्यूसेक असे नाशिक जिल्ह्यातील 14 धरणांमधून विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील 6 धरणं 100 टक्के भरली आहेत. यात भाम, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, हारणभारी, केळझर या धरणांचा समावेश आहे.

वरील धरणातून विसर्ग सुरू असल्याने नांदुर मधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी 9 वाजेपर्यंत 43882 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत होता. तो दुपारी 12 वाजता 39000 क्यूसेकवर आणण्यात आला. पुन्हा काल सायंकाळी 6 वाजता 35918 क्यूसेकवर आणण्यात आला. काल सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 24.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला. कालही गोदावरी दुथडी भरून वाहत होती. दरम्यान, जायकवाडी धरणात नाशिक आणि नगर जिल्ह्यातून पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात 53334 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. 6 वाजता या जलाशयात 60.71 टक्के उपयुक्त पाणी साठा झाला होता. 46.55 टीएमसी उपयुक्त पाणी साठा झाला होता, तर मृतसह एकूण साठा 72.62 टीएमसी इतका झाला आहे.

जायकवाडी जलाशयात 24 तासात 4.8 टीएमसी पाणी दाखल झाले. काल सायंकाळी सहा वाजता भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाणी प्रवरा नदीच्या नेवासा तालुक्यातील मधमेश्वर बंधार्‍याच्या जवळ 12620 क्यूसेकने विसर्ग नोंदला गेला. त्याच वेळी गोदावरीवरील वैजापूर तालुक्यातील नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ 43500 क्यूसेकने विसर्ग नोंदला गेला. उद्या दिवसभरात जायकवाडी जलाशयात 65 टक्क्यांहून अधिक पाणी साठा होऊ शकतो. 65 टक्क्यांचा पुढे हा साठा सरकल्यानंतर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांची समन्यायी पाणी वाटपातून यंदाही सुटका होणार आहे.

ताज्या बातम्या