Sunday, May 26, 2024
Homeनगरमुळा निम्मे भरण्याच्या मार्गावर

मुळा निम्मे भरण्याच्या मार्गावर

कोतूळ, भंडारदरा (वार्ताहर)

नगर जिल्ह्यातील शेती आणि अहमदनगर एमआयडीसीचे भवितव्य अवलंबून असणारे मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात पाऊस सुरू असून काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 11848 दलघफू झाला आहे. पावसाचे प्रमाण असेच टिकून राहिल्यास तीन-चार दिवसांत हे धरण निम्मे भरलेले असेल.

- Advertisement -

हरिश्‍चंद्र गड, पाचनई, आंबितमध्ये गुरूवारी पावसाचा जोर वाढल्याने काल शुक्रवारी सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 7667 क्युसेक होता. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी पाणीसाठा 11848 दलघफू होता. त्यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे काल या धरणातील पाणीसाठा 46 टक्क्यांवर पोहचला होता. दिवसभरात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने सायंकाळी नदीतील विसर्ग 4200 क्युसेकपर्यंत घटला होता.

भंडारदरा पाणलोटातील गुरूवारी रात्री चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर, पांजरे आणि रतनवाडी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे काल सकाळी संपलेल्या 24 तासांत तब्बल 440 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यानंतरही पाण्याची आवक सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 8380 दलघफूवर (75.91टक्के) पोहचला होता. काल दिवसभरात पावसाचा जोर ओसरला. भंडारदरात काल दिवसभराचा पाऊस केवळ 17 मिमी नोंदवला गेला. निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू असून 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल दुपारी पाणीसठा 3000 दलघफूवर गेला होता.

गत 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा : भंडारदरा 97, घाटघर 116, पांजरे 50, रतनवाडी 130, वाकी 67 मिमी.

- Advertisment -

ताज्या बातम्या