Wednesday, April 9, 2025
Homeनगरमुळा पाटबंधारे विभागाचा ‘हम करे सो कायदा’

मुळा पाटबंधारे विभागाचा ‘हम करे सो कायदा’

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

गेल्या महिनाभरापासून मुळा धरणातून असलेले रब्बी आवर्तन बंद होण्याची वेळ आली असताना अद्यापही शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागांमधील अनेक गावांना पाणी मिळालेले नाही. मुळा पाटबंधारे विभागाच्या ‘हम करे सो कायदा’ पद्धतीच्या कामकाजाबाबत शेतकरी, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
एक मार्चपासून सुरू असलेल्या रब्बी आवर्तनातून अनेक गावांना अजूनही पाणी मिळालेले नाही. टेल टू हेड पद्धतीने पाणी वाटप केवळ नावापुरतेच असल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या सामनगाव, लोळेगाव, मळेगाव, आखतवाडे, वडूले, भातकुडगाव, गुंफा, जोहरापूर, वरूड, अमरापूर या भागाला डावलून हेडच्या भागाला झुकते माप देण्यात आले आहे. आता आवर्तन बंद होण्याची वेळ आली तरी पाट पाण्याच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने शेतकर्‍यांनी पाणी वाटप संस्थेचे राजीनामे देण्याचा, उपोषणाचा, आंदोलनाचा इशारा देऊनही मुळा पाटबंधारे विभागाला जाग आलेली नाही.

- Advertisement -

मुळा धरणातून पाणी देताना प्रत्येक रोटेशन ला संबंधित अधिकार्‍यांकडून टे ल च्या भागातील शेतकर्‍यांना व पाणी वापर संस्थांना सापत्न वागणूक मिळत असून अनेक ठिकाणी शाखाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी पदाचा चार्ज एकाच अधिकार्‍यांकडे आहे. त्यामुळे त्यांची मनमानी, अरेरावी वाढली आहे. टेलच्या भागातील शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी इतरत्र पळवले जात आहे. त्यासाठी कालव्यातील पाईपलाईन, अधिकृत सायफन आउटलेट यांचा वापर केला जातो. प्रसंगी कालवे फोडून पाणी वळवले जात आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने टेलच्या भागातील शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र लढा उभारावा लागणार असल्याची प्रतिक्रिया मुळा पाट पाणी संघर्ष समितीचे शिवाजीराव भिसे यांनी व्यक्त केली.

त्यांनी आमदार राजळे यांच्या उपस्थितीत शेवगाव तहसील कार्यालयात पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत मुळा धरणाच्या आवर्तनातून तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, बैठकीत जलजीवन मिशनच्या योजनेच्या कामाबाबत चर्चा करण्यातच अधिक वेळ गेला. परिसरातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पंचायत समितीच्या टंचाई विभागाकडे चौकशी केली असता ज्या गावातून पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी आहेत तेथील कामगार तलाठी व ग्रामसेवकांना टँकर मागणी अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. टंचाई निवारणासाठी संबंधितांकडून अजून तरी टोलवाटोलवी सुरू असल्याचे चित्र आहे.

भटकंती सुरू
शेवगाव तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत चालली असून पिण्याचे तसेच शेतीसाठी पाणी व जनावरांच्या चार्‍यासाठी शेतकरी, नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने आढावा बैठकी घेतल्या आहेत. प्रशासनाने आता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पॅट परीक्षेची नववीची प्रश्नपत्रिका फुटली

0
संगमनेर |वार्ताहर| Sangamner महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून मंगळवारपासून (दि.8) सुरू होणार्‍या पायाभूत चाचणी परीक्षा क्रमांक दोन या पॅट परीक्षेची इयत्ता नववीची...